बुधवार, ७ मार्च, २०१२


महिलांनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा - मुख्यमंत्री

          मुंबई, दि. 7 मार्च : राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावरसुद्धा महिला आपल्या कार्यकर्तृत्वाने यशाला गवसणी घालत आहेत. आज महिलांना आपल्या बुद्धीमत्तेचे कसब दाखविण्यासाठी वेगवेगळे क्षेत्र खुली झाली आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आवाहन करुन राज्यातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
          मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, नुकत्याच झालेल्या पहिल्याच विश्वचषक कबड्डी स्पर्धेत महिलांच्या भारतीय संघाने अजिंक्यपद पटकाविले. महाराष्ट्राला सावित्रीबाई फुलेंपासून महिला समाजधुरिणांची फार मोठी परंपरा लाभल आहे. तसेच महिलांच्या उन्नतीसाठी समाजसुधारकांनी केलेल्या संघर्षामुळे महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे. देश आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्त्री चळवळीचा सकारात्मक परिणाम होऊन महाराष्ट्र शासनाने महिला धोरण जाहिर केले. देशामध्ये महिला धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन स्थानिक राजकारणाची सत्ता महिलांच्या हाती दिली आहे.
          राज्य शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या. महिला बचतगटांना चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा तसेच 90 टक्क्यांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा स्वयंसहाय्यता महिला बचतगटांमार्फत आणि महिला मंडळामार्फत करणे तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण असे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत.
          राज्यातील सर्व महिलांना, त्यांच्या क्षमता विकसीत होण्यासाठी आणि कर्तबगारीला संधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा