कबड्डीत विश्वविजेते पद मिळवून
देणाऱ्या महाराष्ट्रकन्यांना प्रत्येकी एक कोटी
---------------------------------------------
प्रोत्साहनात्मक मदतीबाबत लवकरच धोरण
-मुख्यमंत्री
मुंबई, दि.7 : भारतीय संघाला कबड्डीत विश्वविजेते पद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील दिपीका जोसेफ,पुणे, सुवर्णा बारटक्के, मुंबई व अभिलाषा म्हात्रे या तीन महाराष्ट्रकन्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये तर कोल्हापूर येथील कबड्डी प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांना 25 लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली आहे. अशा प्रकारची प्रोत्साहनात्मक मदत देण्याबाबत राज्य शासनामार्फत लवकरच निश्चित असे धोरण तयार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करुन विश्वचषक कबड्डी स्पर्धा गाजविणाऱ्या महाराष्ट्रातील सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे व प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, आमदार भाई जगताप उपस्थित होते.
भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करुन कबड्डी स्पर्धा गाजविणाऱ्या महाराष्ट्रकन्यांचा तसेच प्रशिक्षकांचा राज्यातील जनतेला अभिमान आहे. कबड्डी हा अस्सल भारतीय क्रीडा प्रकार असल्याने या खेळाला प्रोत्साहन मिळावे हा राज्य शासनाचा हेतू आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे, तसेच अशा प्रकारच्या खेळाकडे मुला-मुलींनी आकर्षित व्हावे असा आमचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांचे अभिनंदन.
59 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पारितोषिक प्राप्त कलाकारांचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी अभिनंदन केले. देऊळ या चित्रपटातील भूमिकेसाठी गिरीष कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच बरोबर बेस्ट फिचर फिल्म म्हणून देऊळ तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून शाळा या चित्रपटाची निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट संवादाचे पारितोषिक गिरीष कुलकर्णी तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार शाळा या चित्रपटाने मिळविला आहे. गेल्या चार-पाच वर्षात मराठी चित्रपटाने आपला दर्जा वाढविला आहे. राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटांची निवड होत आहे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
-----00-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा