एमएमआरडीएच्या 4825 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
मेट्रो, मोनो व रस्ते प्रकल्पांना अर्थसंकल्पात प्राधान्य
मुंबई, दि. 6 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 2012-13 वर्षासाठीचा 4 हजार 825 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्पामध्ये मेट्रो, मोनो आणि रस्ते प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. मोनो प्रकल्पासाठी 870 कोटी, मेट्रो प्रकल्पासाठी 338 कोटी तर रस्ते प्रकल्पांसाठी 1460 कोटीं रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
नगरविकास विभागाचे राज्यमंत्री भास्कर जाधव, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल आस्थाना, मुंबई महानगर पालिका आयुक्त सुबोधकुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव टी.सी.बेंजामीन व इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांशी विविध प्रकल्पांसंदर्भात चर्चा करुन त्याबाबत आढावा घेतला.
या अर्थसंकल्पामध्ये, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी प्राधिकरणातर्फे 660 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पूर्व मुक्त मार्ग, आणिक-पांजरपोळ जोड रस्ता, पांजरपोळ-घाटकोपर जोड रस्ता, मिलन येथील रेल्वे ओलांडणी पूल आणि सहार उन्नत मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी ही तरतुद करण्यात आली आहे. त्याचबरोबर विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी प्राधिकरणाने 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशामध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत विविध रस्ते, उड्डाणपूल आणि खाडी पूल बांधण्यात येत आहेत. हे सर्व प्रकल्प वसई, विरार, मिरा रोड, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, कर्जत आणि बदलापूर येथे राबविण्यात येत आहेत. ठाणे येथे 6 उड्डाणपूल आणि ठाणे-बेलापूर मार्गावर एक रेल्वे ओलांडणी पूलही बांधण्यात येत आहे.
22 कि.मी.लांबीच्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी देशी आणि विदेशी कंपन्यांकडून प्रतिसाद लाभला आहे. या प्रकल्पासाठीची अर्हता विनंती प्रक्रिया या महिन्या अखेर पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे 8800 कोटींच्या या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.
शहरामध्ये येणे-जाणे सुकर करणारा आणखी एक प्रकल्प म्हणजे विरार (नवघर) पासून अलिबागपर्यंत जाणारा 126 कि.मी.लांबीचा बहुउद्देशीय मार्ग. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विरार (नवघर) ते चिरनेर (79 कि.मी.) मार्गाचे काम हाती घेण्यात येणार असून दुसत्या टप्प्यात चिरनेर ते अलिबाग (47 कि.मी.) मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक आराखडे आणि तांत्रिक-आर्थिक सुसाध्यता अभ्यास पूर्ण झालेला असून हे दस्तावेज प्रादेशिक रस्ते वाहतूक नकाशामध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. 9326 कोटीं रुपयांच्या या बहुउद्देशीय मार्गावर मुख्य वाहतुकीसाठीच्या मार्गिकांशिवाय बसेस, दुचाकी वाहने आणि यंत्र रहित वाहनांसाठी विशेष मार्गिका उपलब्ध असणार आहेत. प्राधिकरणाने प्रकल्पासाठी 50 कोटीं रुपयांची तरतूद केलेली आहे.
मेट्रो आणि मोनोरेल प्रकल्पांना प्राधिकरणाने नेहमीच प्राधान्य दिलेले असून अर्थसंकल्पामध्ये मोनो रेल प्रकल्पासाठी 873 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी प्राधिकरणाने रु.338 कोटींची तरतूद केलेली आहे. यापैकी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गासाठी 100 कोटी रुपये, चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गासाठी 138 कोटी रुपये तर कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गासाठी 100 रु.कोटी राखून ठेवण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने रस दाखवून प्रकल्प पडताळून पाहण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या मेट्रो मार्गाला चालना मिळाली आहे. या प्रकल्पासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार असून या वर्षामध्ये अंतरिम सल्लागारांची नेमणूक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेशी करार, निविदा प्रक्रियेसाठी जागतिक स्तरावरील संस्थांना नियंत्रण, सर्वोत्कृष्ट निविदा धारकाची निवड आणि बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात असे विविध उपक्रम प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-2 साठी अर्थसंकल्पामध्ये 290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यान 5 वा आणि 6 वा रेल मार्ग बांधण्याबरोबरच ठाणे आणि दिवा दरम्यान अतिरिक्त रेल मार्गही बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान 6 वा रेल्वे मार्ग आणि अंधेरी पर्यंत असलेल्या हार्बर मार्गाचा गोरेगांवपर्यंत विस्तार करणे असे अनेक उपक्रम या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणार आहेत.
प्राधिकरणाच्या 2012-13 च्या अर्थसंकल्पामध्ये आणखीही काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठीही तरतूद करण्यात आली असून यामध्ये मिठी विकास प्रकल्पासाठी 82 कोटी, पुनर्विकास आणि पुनर्वसन यासाठी 65 कोटी, मुंबई महानगर प्रदेश विकासासाठी 50 कोटी, वांद्रे-कुर्ला संकुलातील नागरी सुविधासाठी 55 कोटी, वडाळा ट्रक टर्मिनससाठी 50 कोटी व ध्वनी प्रदूषण नियंत्रण उपकरणांसाठी 37 कोटी रुपयांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
यावेळी आमदार नवाब मलिक, प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य प्रकाश बिनसाळे, मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे, नगरसेवक राजहंस सिंह, आशिष शेलार, सुनील प्रभू, गृह विभागाचे प्रधान सचिव गौतम चॅटर्जी, सिडकोचे संचालक, तानाजी सत्रे, महानगर प्रदेशातील इतर महानगरपालिका आणि महानगरपरिषदांचे महापौर आणि अध्यक्ष आणि प्राधिकरणाचे संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा