मंगळवार, ६ मार्च, २०१२



ई-गव्हर्नन्सचा अधिकाधिक वापर करुन
प्रशासनात पारदर्शकता आणणार -मुख्यमंत्री
       मुंबई, दि. 6 : ई-गव्हर्नन्सचा अधिकाधिक वापर करुन  प्रशासनात पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या (सीएसआय) 47 व्या स्थापना दिनानिमित्त व्हीजेटीआय  येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
           सीएसआयचे अध्यक्ष एम. डी. अग्रवाल, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. रवी ग्रोवर, सीएसआय चे संस्थापक सदस्य पद्मभूषण डॉ. एफ. सी. कोहली, प्रा. एन. बालकृष्णन व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
          प्रशासनात ई-टेंडरिंग पद्धत लागू करण्यात आली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ई-स्कॉलरशीप सुरु करण्यात आली आहे. मंत्रालयातील कारभार संपूर्णपणे पेपरलेस करण्याची कार्यवाही सुरु आहे. संगणकामुळे जगात क्रांती झाली असली तरी जोपर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचत नाहीत तोपर्यंत ही क्रांती पूर्ण झाली आहे, असे आपण म्हणू शकणार नाही. 
          सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत आघाडीवर असला तरी हार्डवेअर क्षेत्रात  मात्र आपणास अधिक प्रगती करण्याची गरज आहे.  जपान व चीनशी स्पर्धा करण्यासाठी त्या दर्जाचे संशोधन देशात होण्याची गरज आहे. याचबरोबर देशातील स्थानिक भाषांमध्ये सॉफ्टवेअर उपलब्ध झाले तरच हे तंत्रज्ञान सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहचू शकेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
          यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएसआयच्या सीएसआय जर्नल ऑफ कॉम्प्युटींग या ई-जर्नलचे प्रकाशन करण्यात आले.

          सीएसआयचे अध्यक्ष एम. डी. अग्रवाल यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सीएसआयची माहिती दिली आणि महाराष्ट्र शासनाबरोबर काम करण्याची इच्‍छा व्यक्त केली.
          संगणकीय क्रांतीचे परिणाम अद्याप दृष्य स्वरुपात दिसू लागलेले नाहीत. संगणकामुळे माहितीची दारे खुली झाली असली तरी संगणकाने अनेक आव्हानेही निर्माण केली आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी संशोधक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ करत असलेले प्रयत्न लोकांसमोर यायला हवेत. असे मत यावेळी डॉ. रवी ग्रोवर यांनी मांडले.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा