मित्रांनो ! देशासाठीही काही करुन जबाबदार नागरिक व्हा
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6 : 'सायन्स रिमेन्स माय फर्स्ट लव्ह . . ! विज्ञान, तंत्रज्ञानाची आज देशाला खूप गरज आहे. मित्रांनो, आज तुम्ही पदवीधर होऊन जगातील नव-नव्या आव्हानांना सामोरे जाताय, पण स्वत:च्या विचाराबरोबरच देशासाठीही काही करावयाचे आहे हा विचार जोपासा . . शासन नेहमीच आपल्या पाठीशी आहे. . ' असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
रसायन तंत्रज्ञान संस्था (आय.सी.टी.) या अभिमत विद्यापीठाच्या प्रथम दिक्षांत समारंभ प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या समारंभाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, कुलगुरु प्रा. डॉ. जी. डी. यादव, कुलसचिव एस.आर.शुक्ला आदी उपस्थित होते.
माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्था या अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या या दिक्षांत समारंभात मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्यात रमले. मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, तुम्हा विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे आहे. ती समाजाची गरज आहे. देशासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा आणि जबाबदार नागरिक बना असे मौलिक आवाहन त्यांनी यावेळी केले. या संस्थेत माझी दुसरी भेट असून केंद्रात राज्यमंत्री असताना यापूर्वी या संस्थेला भेट दिली आहे, असे सांगून उच्च शिक्षणातील विविध समस्यांचा आढावा त्यांनी घेतला. या समस्या दूर करुन उच्च शिक्षणाच्या पद्धतीत बदल करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी राज्याला या अभिमत विद्यापीठाचा अभिमान असून विद्यापीठाच्या सर्वांगिण सहकार्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. या विद्यापीठाने गुणवत्तेच्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही. नेहमी गुणवत्ता अग्रक्रमाने पाहीली, या विद्यापीठा विद्यार्थी हा विद्यार्थी नसून तो खऱ्या अर्थाने उद्योजकच आहे. रोजगार निर्मिती करण्याची क्षमता त्याच्यात आहे, असेही विचार त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे हे विद्यापीठ समानतेच्या तत्वांचा पुरस्कार करते. येथे गरीब-श्रीमंत हा भेदभाव नाही, तसेच येथे येणारे प्रत्येक विद्यार्थी ज्ञान आणि गुणवत्तेची शिदोरी घेऊनच बाहेर पडतो, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. यादव यांच्या विषयीही गौरवोद्गार श्री. टोपे यांनी यावेळी काढले. तसेच या महत्त्वपूर्ण अशा समारंभास बोलाविल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले.
कुलपती डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आजचा हा दिवस ऐतिहासिक दिवस असून 1962 साली पाहीलेल्या एका स्वप्नाची पूर्ती झाली असल्याचे सांगितले. तसेच विद्यापीठाने जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्याचे स्वप्न पाहणे योग्यच असून त्याच्याशी आपण सहमत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या विद्यापीठाच्या प्रथम दिक्षांत समारंभात कुलपतींनी विद्यार्थ्यांना पदवी देण्यास संमती दिल्यानंतर कुलगुरुंच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कुलगुरु प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी समारंभाच्या प्रारंभी विद्यापीठाच्या पूर्वीपासूनच्या म्हणजे संस्था, स्वायत्त ते अभिमत या 79 वर्षाच्या कारकीर्दीचा सविस्तर आढावा घेऊन उपस्थितांचे स्वागत केले. तसेच हे विद्यापीठ सध्या जागतिक पातळीवर 4 थ्या क्रमांकाचे असून लवकरच ते आम्ही ते प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलपतींच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या समारंभासाठी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवर, विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा