करमणूक क्षेत्राने शाश्वत मुल्यांचे जतन करावे
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 14: चित्रपट, प्रसार माध्यमे यांचा तरुण पिढीवर मोठा प्रभाव आहे. तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्यासाठी करमणूक क्षेत्राने शाश्वत मुल्यांचे जतन करावे, मोठया चित्रपट निर्मात्यांनी या दृष्टीकोनातून चांगली चित्रनिर्मिती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज (फिक्की) ने फ्रेम 2012 या 13 व्या जागतिक परिषदेचे आयोजन पवई येथील हॉटेल रेनायन्स मध्ये केले आहे. या परिषदेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. फिक्कीच्या इंटरटेनमेंट कमिटीचे सहअध्यक्ष करण जोहर, ब्रॉडकॉस्ट फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर, जनरल सेक्रेटरी डॉ. राजीव कुमार, मोशन पिक्चर्स असोसिएशन ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ख्रिस डॉड आणि चित्रपट व प्रसार माध्यमातील मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.
गेल्या वर्षीपासून चित्रपट क्षेत्राने चांगली भरारी घेतली आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनी हिंदी सिने सृष्टीला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले की, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांना सात पुरस्कार जाहीर झाले आहेत. मनोरंजन क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मितीचा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणाहून चित्रपट प्रक्षेपित करणे शक्य झाले आहे. मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना निवडी करिता भरपूर वाव आहेत. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस यांनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. या नवीन क्षेत्रांचे आपण सकारात्मक दृष्टीकोन ठेवून स्वागत केले पाहिजे. फिक्कीने आतापर्यंत मनोरंजन क्षेत्राला फार मोठे सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आहे.
आजच्या परिषदेतही या क्षेत्राशी संबंधीत नवीन संकल्पना, अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चा होईल व त्याचा चित्रपट सृष्टीला फायदा होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
भारतात निर्माण होत असलेल्या दर्जेदार सिनेमांचे कौतुक करुन हॉलीवुड आणि बॉलीवुड यांच्या एकत्रित सहकार्याने सिनेसृष्टीत क्रांतीकारी बदल करण्याचा मानस यावेळी ख्रिस डॉड यांनी व्यक्त केला.
करण जोहर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात फिक्कीच्या इंटरटेनमेंट कमिटीने केलेल्या कार्याची माहिती दिली व भविष्यातही सिनेसृष्टीला फिक्कीकडून भरीव सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
फिक्की फ्रेमस् 2012 या अहवालाचे आणि इंटरटेनमेंट लॉ बुक 2012 या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा