अपेक्षेप्रमाणे रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्राला न्याय : मुख्यमंत्री
राज्यातील रेल्वेचे नवे प्रकल्प मार्गी लागतील
मुंबई दि. १४ : महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकार यांच्या मागण्यांना अर्थसंकल्पात स्थान देऊन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी महाराष्ट्राला न्याय दिला आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे राज्यातील प्रलंबित रेल्वेमार्ग आणि प्रकल्पांची कामे मार्गी लागतील,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत संसद सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिशय फलदायी झाल्याचे अर्थसंकल्पातील मुंबई तसेच उर्वरीत महाराष्ट्राबाबतच्या तरतूदी पाहता लक्षात येते, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे मुंबईकरांना त्याचा खूप फायदा होईल. पनवेल येथील नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स विकसित करण्याचा निर्णय, चर्चगेट-विरार उन्नत उपनगरी रेल्वे कॉरिडॉर, विरार ते पनवेल कॉरिडॉर, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाड्या सुरु करणारê, प्रस्तावित उन्नत रेल्वे कॉरिडॉरवर पश्चिम उपनगरांप्रमाणे सेन्ट्रल मार्गावरदेखील वातानुकुलीत गाड्या सुरु करण्याचा विचार अशी विविध आश्वासने देऊन रेल्वेमंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे. एमयुटीपी-३ चे नियोजन सुरु असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी घोषित केले असून त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे सुयोग्य जाळे या महानगरात पसरेल.
७५ नव्या उपनगरीय रेल्वे सुरु करण्याचे घोषित करण्यात आले आहे. पुणे- अहमदाबाद द्रुतगती रेल्वे मार्गाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. असून निधीची तरतूद करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगून दोन मोठ्या शहरातील रेल्वे प्रवाशांची सोय पाहिली आहे.
भाडेवाढ करताना प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार नाही याची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे ही दिलासा देणारी बाब असल्याचे मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला सम्पूर्ण प्राधान्य देऊन रेल्वेमंत्र्यानी आपल्यातील संवेदनशील व्यक्तीचा परिचय करून दिला आहे रेल्वे सुरक्षा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णयही महत्वपूर्ण आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या भागीदारीत मनमाड-इंदोर, पुणे-नाशिक हे नवीन मार्ग उभारण्यात येणार असून अंबरनाथ जवळ पाणीपुरवठ्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. वर्धा-नांदेड व्हाया यवतमाळ-पुसद, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाच्या कामाला देखील गती देण्यात येणार आहे. याशिवाय नांदेड-लातूर रोड साठी सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. पुणे-मुंबई-अहमदाबाद या मार्गावर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा अभ्यास देखील पुर्ण होत आला आहे. तसेच अमरावती-पुणे एक्सप्रेस, शिर्डी-पंढरपूर एक्सप्रेस तसेच हापा-मडगाव एक्सप्रेस, मिरज-कुर्डूवाडी या गाड्यांची घोषणा अर्थसंकल्पात झाल्यामुळे राज्यातील सर्व भागांना न्याय मिळाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा