व्ही.जे.टी.आय.जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट व्हावी
यासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 9 : वीरमाता जिजाबाई टेक्नीकल इन्स्टिट्यूट (व्ही.जे.टी.आय.) जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट होणे आवश्यक असून त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 50 कोटी निधीची भरीव मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे जाहीर केली व्ही.जे.टी.आय. येथे पदवीका दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष उद्योगपती नस्ली वाडीया, संचालक डॉ. एम.सी. भट, संचालक मंडळाचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.
व्ही.जे.टी.आय. चा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहता आल्याबद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, व्ही.जे.टी.आय. सारख्या नामवंत संस्थेतून पदवी अथवा पदवीका मिळणे ही गौरवास्पद बाब आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तसेच समाजात स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करावा. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आपल्याला संशोधनासाठी नवीन क्षेत्रे निवडावी लागतील. देशाला भेडसावणाऱ्या ऊर्जा, पाणी, कृषी तंत्रज्ञान आदी समस्या सोडविण्यास उपयुक्त असे संशोधन विद्यार्थ्यांनी करावे, असाही सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. या दीक्षांत समारंभानंतर तुम्ही विद्यार्थी दशा संपवून व्यावहारीक जगात प्रवेश करणार आहात. या जगात तुम्ही कितीही यश मिळविले तरी तुमच्या मूळ संस्थेशी बांधिलकी जपा तसेच समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करा, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पदवीका प्राप्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन श्री. राजेश टोपे म्हणाले की, तुम्हाला या संस्थेत प्रवेश मिळाला याचाच अर्थ तुम्ही मेहनती व हुशार आहात. याच सातत्याने तुम्ही पुढील आयुष्यात प्रामाणिकपणे आणि या संस्थेच्या प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. शिक्षण संस्थांनीही शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, अशी अपेक्षाही श्री. टोपे यांनी व्यक्त केली. व्ही.जे.टी.आय. सारख्या नामवंत संस्थेने विद्यार्थ्यांचे शिक्षण संपताच त्यांना उत्तम ठिकाणी नौकरी मिळेल याचे उत्तरदायीत्व वा जबाबदारी स्वीकारावी, असेही ते म्हणाले.
व्ही.जे.टी.आय. च्या 125 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेऊन नस्ली वाडीया यांनी संस्थेच्या या पुढील पाच वर्षातल्या योजनांविषयी माहिती दिली. व संस्थेच्या समस्या मांडल्या. नस्ली वाडीया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीका प्रमाणपत्रे देण्यात आली. तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संचालक डॉ. एम. सी. भट यांनी आपल्या प्रास्तविकातून या पदविका दीक्षांत समारंभाची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला संचालक मंडळातील तसेच सिनेटचे सर्व सदस्य, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा