आधुनिक भारताच्या संरक्षण धोरणाचा पाया
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घातला
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
सातारा, दि. 25 (जिमाका) - आधुनिक भारताच्या प्रभावी संरक्षण धोरणाचा पाया घालण्याचे महत्त्वपूर्ण काम स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केले असल्याचे गौरवोद़गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भारताची संरक्षण व परराष्ट्र नीती - यशवंतराव चव्हाण यांचे योगदान या विषयावरील आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे उपस्थित होते.
वेणूताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि संस्कृतीमंच यांच्यावतीने व इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, नवी दिल्ली (आयसीडब्ल्यूए) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कराड येथील वेणुताई चव्हाण स्मारक ट्रस्टच्या सभागृहात आयोजित केलेल्या या चर्चासत्राला भारताचे राजदूत व सध्याचे आयसीडब्ल्यूएचे महासंचालक सुधीर देवरे, भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत रॉनेन सेन, एअर कमांडर पद्मभुषण जसजितसिंग, प्रा. वरुण सहानी, डॉ. श्रीकांत परांजपे, डॉ. दिलीप पाडगांवकर, डॉ. विजय सखुजा आदी मान्यवर उपस्थित होते.
सैन्य दलांचं नीतीधैर्य उंचावण्याचं महत्त्वाचं काम स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केले असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चीनी आक्रमणामुळे आपल्या संरक्षण क्षेत्राच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. यावेळी पंतप्रधान पंडित नेहरुंचा पूर्ण देशभरात संरक्षणमंत्रीपद खंबीरपणे सांभाळू शकेल अशा खंबीर नेत्याचा शोध स्व. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्रातून दिल्लीला बोलावून घेतल्याने संपला. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी अशा हताश अवस्थेत सैन्यदलाचे नीतीधैर्य उंचावण्याचे मोलाचे काम संरक्षणमंत्री म्हणून केले. सैन्य दलाच्या पुनर्रचनेबरोबरच वायुसेनेच्या बळकटीकरणासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेली भुमिका चीन आक्रमणानंतर लगेचच तीन वर्षांनी 1965 च्या पाकिस्तान विरुध्दच्या युध्दामध्ये उपयुक्त ठरली. पाकिस्तानविरुद्ध वायुदलाचा वापर केल्यामूळे पाकिस्तानी आक्रमणाचा कणाच मोडला व पाकिस्तानवर मात करणे शक्य झाले, असेही ते म्हणाले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात अनेक विभागांना आपल्या कामातून नवा चेहरा दिला विशेषत: संरक्षण खात्यातील त्यांची कारकीर्द सर्वार्थाने महत्वाची ठरली असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चीन आक्रमणाच्यावेळी हताश सैन्यदलाचे नीतीधैर्य वाढविण्याचे काम त्यांनी केले. भारतात संरक्षणसामुग्री निर्मितीसाठीचे कारखाने सुरू केले. रशियाकडून मिग-21 विमानांची खरेदी करण्यासोबतच ती देशांतर्गत बांधणीसाठी रशियाशी करार केले. नवीन युद्धनौका खरेदी करण्यात आली. अमेरिकेशी संरक्षणविषयक संबंध वाढविण्याचे काम केले. मित्र राष्ट्रांशी चांगले संबंध निर्माण करण्याबरोबरच भारतात संरक्षणसामुग्री निर्मितीचा क्रांतिकारी निर्णयही त्यांनी घेतला. ग्रामीण भागातील हुषार तरुण सैन्यामध्ये भरती होण्यासाठी देशामध्ये सैनिकी शाळा सुरु करण्याचे कामही यशवंतराव चव्हाण यांनी केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण, गृह, अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अशी अत्यंत महत्त्वाची खाती समर्थपणे सांभाळणारे यशवंराव चव्हाण हे एकमेव नेते होते असे मुख्यमंत्री म्हणाले की, चव्हाण साहेबांचे दिल्लीतील काम आणि कर्तृत्व देशातील विशेषत: महाराष्ट्रातील जनमाणसापर्यंंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशी चर्चासत्रे उपयुक्त ठरतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्व.यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने राज्य शासनामार्फत साजरे होत असून त्यांचेवरील जीवननाट्य, चर्चासत्रे, प्रदर्शने असे विविध कार्यक्रम राज्याच्या विविध भागातून साजरे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरुन पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे त्यांच्या कार्याचे विविध पैलू लोकंापुढे यायला हवेत यासाठी राज्य शासनाने जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी देशपातळीवर तसेच जागतिक पातळीवर केलेले कामही लोकापुढे येणे गरजेचे आहे. भारताचे संपूर्ण आशियामध्ये संरक्षणदृष्ट्या एक महासत्ता म्हणून जे स्थान निर्माण झाले आहे त्याचा पाया यशवंतराव चव्हाणं यांनीे घातला, असे गौरवोदगारही पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.
राजदूत सुधीर देवरे बोलताना म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण हे महान राष्ट्रीय नेते होते, उत्तम प्रशासक म्हणुनही त्यांची कारकीर्द मोठी आहे. त्यांनी केंद्रामध्ये संरक्षण, अर्थ, परराष्ट्र्र व्यवहार अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. भारताची आधुनिक संंरक्षण आणि परराष्ट्रनीती बनविण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारत पूर्णत: जाणून घेऊन त्याप्रमाणे धोरणनिर्मिती करणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांचा समावेश होतो. 1974 ते 77 हा काळ परराष्ट्रांशी अत्यंत गुंतागुंतीचे संबंध असलेला काळ होता. अशा कठीण प्रसंगात त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली. त्यांच्या परराष्ट्रनीती विषयक धोरणासह संरक्षण धोरणाचा अभ्यास आजच्या संदर्भातही उपयुक्त आहे म्हणूनच हे राष्ट्रीय चर्चासत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड या कर्मभूमीत घेण्याचे ठरले, असेही सुधीर देवरे म्हणाले.
आमदार बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संस्कृती मंचचे डॉ. सतीश घाडगे यांनी केले. आभार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मानले.
यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयक 'यशवंत' या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा