क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्या निधनाने
स्वातंत्र्य आंदोलनातील एक दुवा निखळला
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 22 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्या निधनाने स्वातंत्र्य आंदोलनातील एक दुवा निखळला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ` क्रांतिवीर नागनाथअण्णा हे अशा एका पिढीचे प्रतिनिधित्व करतात, की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन परकीय सत्तेशी फार मोठा लढा दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही त्यांनी समाजसेवा हेच ध्येय उराशी बाळगुन संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केले. प्रखर राष्ट्रप्रेम, सामान्यांप्रती कळकळ आणि सेवावृत्ती यांनी परिपूर्ण असे आदर्श आणि कृतार्थ आयुष्य जे जगले. स्वातंत्र्य आंदोलनात क्रांतिकारी भूमिका घेतल्याने नागनाथअण्णा नायकवडी हे क्रांतिवीर म्हणून ओळखले जात. शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडून त्यांनी 1942 च्या `चले जाव` आंदोलनात उडी घेतली. समाजातील सामान्य जनतेत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने त्यांनी किसान शिक्षण संस्थेची स्थापना केली. शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटनेची स्थापना केली. नायकवडी यांनी हुतात्मा किसन वीर साखर कारखाना स्थापन केला जो की देशातील आदर्श कारखाना समजला जातो. या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोलाचे कार्य त्यांनी केले. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अमेरिकेत स्थायिक असलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे त्यांना अलिकडेच समाजकार्य जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्य आंदोलनातील एक दुवा निखळला आहे. `
---0---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा