मराठी साहित्यातील माणिक हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 26 : मराठी साहित्यातील मानबिंदु मानले गेलेले ज्येष्ठ कवि माणिक गोडघाटे ऊर्फ कविवर्य ग्रेस यांच्या निधनामुळे मराठी कवितेतील खरेखुरे माणिक हरपले आहे. कविवर्य ग्रेस यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाचे अपरिमित नुकसान झाले असुन जिवंतपणीच मिथक बनलेले कविवर्य ग्रेस मराठी रसिकाच्या मनावर कायम अधिराज्य गाजवतील, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठी कवितेच्या दालनात कविवर्य ग्रेस यांनी गेली 45 वर्षे अक्षरश: अधिराज्य गाजविले. श्री. ग्रेस यांची स्वत:ची अशी विशिष्ट शैली होती. या शैलीने रसिकांना भारुन टाकले.अलिकडेच साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. विदर्भ भुषण हा पुरस्कारही अलीकडेच नागपूर येथे माझ्या हस्ते देण्यात आला होता. त्यांच्या कवितांवर दुर्बोधतेचा शिक्का बसला होता. मात्र त्यांनी कधीही त्याचा प्रतिवाद केला नाही. ते सातत्याने आपली भुमिका कवितेच्या माध्यमातुन मांडत आले.
कविवर्य ग्रेस हे एकांतप्रिय आणि स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेले असे कलंदर व्यक्तिमत्व होते. हा बाणा त्यांनी आयुष्यभर इमानेइतबारे जपला. त्यांच्या या प्रवृत्तीवर आणि इतरांपासून वेगळी प्रतिमा जोपासण्याच्या हट्टावर साहित्य वर्तुळात अनेक वाद निर्माण झाले. भरपूर चर्चा झाली. यामुळे ग्रेस हे जिवंतपणीच एक मिथक बनले. अर्थात त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे याचीही कधी पर्वा केली नाही. साहित्य निर्मिती आणि प्रतिभा यावर असलेली त्यांची आत्यंतिक श्रध्दा आणि निष्ठा होती , असे श्री. चव्हाण म्हणतात.
साहित्यात मुशाफिरी करणारे कवी ग्रेस हे एखाद्या विशिष्ट साहित्य प्रवाहाचा भाग कधीच बनले नाहीत. शब्दकोषांना नवे शब्द देणारा कवी अशी त्यांची प्रतिमा होती. ग्रेस यांचे बोलणे हा स्वत:शी साधलेला एक संवाद असायचा. त्यांची वाणी विलक्षण होती. तिला एक प्रकारचा नाद आणि प्रवाहीपण होते. त्यामुळे ते बोलत असताना ऐकणारा आपले भान हरपून जात असे. साहित्यनिर्मिती आणि प्रतिभा यावर त्यांची अढळ निष्ठा होती. अतिशय उच्च अभिरुची आणि प्रतिभा असूनही ते प्रसिध्दीविन्मुख होते. अशा थोर प्रतिभावंताला आपण सारे मुकलो आहोत, असे श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा