सोमवार, १२ मार्च, २०१२



 स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आणि विचार
नव्या पिढीला प्रेरणादायी -- मुख्यमंत्री
सातारा : 12  :-  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आणि विचार समाजाला  विशेषत: नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले.
         स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या 99 व्या जयंती निमित्त कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळावर आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांना आयोजित केलेल्या शब्दसुरांच्या भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.  यावेळी   स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अपर्ण करुन आदरांजली वाहिली.  त्यांच्या समवेत पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.  यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने काढण्यात आलेल्या देवराष्टे्र ते कराड या यशवंत ज्योतीचे स्वागतही पाहुण्यांच्या उपस्थित करण्यात आले.
        स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आणि विचार तसेच त्यांनी समाजाला दिलेली दिशा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी यासाठी राज्यशासनामार्फत येत्या वर्षाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आल्याचे सांगून  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षातील आजची साजरी होत असलेली त्यांची जयंती हा एक दुग्धशर्करा योग असून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजपासून राज्यभरात शताब्दी वर्ष साजर होत असून आज सायंकाळी मुंबईत देशाच्या राष्ट्रपती महामहीम प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय सोहळ्याचा शुभारंभ होत आहे, ही आनंदाची बाब आहे.
         स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त येत्या वर्षाभरात पुस्तकांचे प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, लघुपट, मालिका असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.  स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्टे्र या जन्मगावी, कराड या कर्मभूमीत तसेच मुंबई, दिल्लीसह राज्याच्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांनी समाजाला नवी दिशा देण्याच काम केलेल्या सर्वच ठिकाणी असे कार्यक्रम येत्या वर्षभरात आयोजित करुन स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा  प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
         महाराष्ट्राच मंगल कलश ज्यांनी आणला अशा महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राने प्रशासनाला घालून दिलेली शिस्त आणि घडी महत्वाची असून स्व. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शक विचारावर आणि त्यांच्या शिकवणीनुसार राज्य शासनही वाटचाल करीत आहे.  राज्याने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.  प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करुन स्व.यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न साकार करु, असा विश्वासही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
       प्रारंभी आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रा. गो. प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. शहरातील विद्यार्थी-विद्यार्थींनींनी यशवंत गीत देशभक्तीपर गीताने स्व. यशवंतराव चव्हाण यांना शब्दसुरांची भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.  आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन केले.  या कार्यक्रमास आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार प्रकाश  आवाडे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, कराडच्या नगराध्यक्षा उमा हिंगमिरे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे, पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, डॉ. अशोक गुजर, स्व. यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे अशोकराव चव्हाण, प्रा. मच्ंछिद्र सकटे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी विविध विभागाचे अधिकारी तसेच नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थ्यीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                00000
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा