बुधवार, १४ मार्च, २०१२


राजकीय फायदा न घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्याबाबत
दिल्लीत 22 मार्च रोजी बैठक : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14 : इंदू मिलच्या जागेसंदर्भात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व आमदार राम पंडागळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, इंदू मिलची जागा स्मारकाला मिळण्यासाठी यापूर्वीच मी सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह आणि केद्रीय वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांना भेटलो. यावेळी पंतप्रधानांनी या मागणीला तत्वत: मान्यता दिली होती. या जागा हस्तांतरणाच्या कार्यवाहीसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने एका समितीची स्थापना केली आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव या समितीचे अध्यक्ष असून त्यात पर्यावरण विभागाचे सचिव, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सहसचिव यांचा समावेश आहे.
या समितीची बैठक 22 मार्च रोजी होणार आहे. पर्यावरणाचा प्रश्न आणि जमिनीचा वस्त्रोद्योग महामंडळाला द्यावयाचा मोबदला, यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून हा प्रश्न या बैठकीत सोडविण्यात येईल.
देशातील पाच राज्यांमधील निवडणुका, मुंबई महानगरपलिकेची निवडणूक आदी कारणांमुळे याविषयी निर्णय घेण्यास वेळ लागला, ही वस्तूस्थिती आहे. या सर्व परिस्थितीत आंबेडकरी जनतेने संयम व सहकार्याची भूमिका घेतली, याबद्दल श्री. चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रश्नाचा राजकीय फायदा घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, तसेच सर्वांनी राजकीय परिस्थिती निटपणे सांभाळावी, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा