रविवार, ४ मार्च, २०१२





                     14 हजार अभियंत्यांना 10 वर्षात रोजगार उपलब्ध होणार
इन्फोसिस कंपनीचा प्रकल्प हे मिहानच्या
स्वप्नपूर्तीचे एक नवे पाऊल : मुख्यमंत्री
नागपूर, दि. 5 : इन्फोसिस कंपनीचा प्रकल्प हे मिहानच्या स्वप्नपूर्तीचे एक नवे पाऊल आहे. 14 हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांना येत्या 10 वर्षात प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या इन्फोसिस कंपनीसोबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा सामंजस्य करार ही नागपूरच्याच नव्हे तर राज्याच्यादृष्टीने ऐतिहासिक घटना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केले.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकूल वासनिक या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते. मिहान विशेष आर्थिक झोन मधील केन्द्रीय सुविधा इमारतीच्या सभागृहात हा करार झाला. एम.ए,डी.सी.चे (महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ) उपाध्यक्ष यू.पी.एस. मदान आणि इन्फोसिस कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक  व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी.  शिबुलाल यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.
            मिहान परिसरात इन्फोसिस कंपनीस 142 एकर जागा देण्यात आली आहे. येत्या तीन वर्षात कंपनीचे प्राथमिक काम पूर्ण करण्यात येईल. पहिल्या पाच वर्षात 100 कोटी रूपयांची गुंतवणूक करून दोन हजार सॉफ्टवेयर अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
            इन्फोसिस कंपनीचे नागपुरातील हे 12 वे आणि महाराष्ट्रातील दुसरे विकास केंद्र आहे. पुणे हे राज्यातील इन्फोसिसचे पहिले केंद्र आहे. पुण्यात 28 हजार लोकांना प्रत्यक्ष तर 75000 लोकांना अप्रत्यक्षपणे  इन्फोसिस कंपनीत रोजगार मिळाला आहे.
             या सामंजस्य करार समांरभात मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर हे एव्हिएशन हब करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहे. त्यामुळे भविष्यात येथील विशेष आर्थिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होण्यास मदतच होणार आहे. विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसन या दोन्ही प्रक्रिया सोबत चालवायच्या असल्यामुळे ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. धावपट्टी निर्मितीसाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया सुध्दा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी  यावेळी सांगितले.                              
            इन्फोसिस कंपनी ही आय.टी क्षेत्रातील कोहिनूर आहे. या कंपनीचे नागपुरात आगमन झाले आहे. विदर्भातील जनतेसाठी ही महत्वाची बाब आहे. मुख्यमंत्री एम.ए.डी.सी कंपनीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी व्यक्तिश: विशेष आर्थिक क्षेत्रात मोठया कंपन्या येण्यासाठी प्रयत्न केले. मिहानसाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळावा म्हणून, काही  नवे निर्णय घेतले. यासाठी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची साथ मिळाली. त्यामुळे विदर्भातील  मिहान प्रकल्पात लवकरच मोठया कंपन्या येतील यात शंका नाही. मिहान मध्ये जागतिक  स्तरावर उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत, असेही मुकुल वासनिक यांनी सांगितले.
            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस. मदान यांनी यावेळी पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. या समारंभास पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयोमंत्री डॉ. नितिन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक उपस्थित होते.                                            ****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा