गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२


  

 राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
       पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                     (प्रसिद्धिपत्रक)                                  दि. 2 फेब्रुवारी 2012
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांची
मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारीला
                                   -नीला सत्यनारायण
मुंबई, दि. 2 : राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची  मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारी 2012 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रूवारीला; तर गडचिरोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये 12 फेब्रुवारीला मतदान होईल. महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. त्यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागविलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे आणि नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी केला जाणार आहे. पुणे आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. दहा महानगरपालिकांसाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची यंत्रे वापरण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून 1 लाख 30 हजार मतदान यंत्रे मागविली आहेत. त्यापेक्षा अधिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्याच्या निवडणूक आधिकाऱ्यांनी कळविले होते; तसेच यातील सुमारे 5 टक्के मतदान यंत्रे सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. यंत्रांची जुळवाजुळव करण्याच्या प्रक्रियेमुळे एकत्रित मतमोजणीचा निर्णय घेण्यासाठी एवढा कालावधी लागला. तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी एका मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे लागतात, असेही राज्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता शिथिल होणार
पूर्वनियोजनानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार होती. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या क्षेत्रात निकालापर्यंत लागू असलेली आचारसंहिता मतदानानंतर विशेष बाब म्हणून शिथिल करण्यात येईल. परंतु निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील आचारसंहिता महानगरपालिकांचे निकाल लागेपर्यंत कायम राहील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

0-0-0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा