शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२


   राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
       पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                                (प्रसिद्धिपत्रक)                                             दि. 2 फेब्रुवारी 2012

आरक्षित जागेवरील उमेदवारांना
प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही
                              -नीला सत्यनारायण

मुंबई, दि. 2 : उच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी/छाननी करण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आल्यास संबंधित उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने मागे घेतल्या आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाही नेहमीच्या पध्दतीने होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करताना उमेदवारांनी दाखल केलेल्या जात वैधता प्रमाणपत्रावर अन्य उमेदवारांनी हरकत घेतल्यास अशा उमेदवारांना त्यासंदर्भात दक्षता समितीचा अहवाल घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज उच्च न्यायालयाच्या या संदर्भातील निर्देशांना स्थगिती दिली. त्यामुळे आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी  सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी 2012 रोजी दिलेल्या आदेशानुसार छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. आता प्रतिज्ञापत्राची अट जरी वगळण्यात आली असली तरी उर्वरित कार्यक्रमाच्या तारखा 1 फेब्रुवारी 2012 च्या आदेशाप्रमाणेच राहतील. त्यानुसार खुल्या जागेवरील नामनिर्देशन पत्रांची छाननी आज पार पडली. उद्या 3 फेब्रुवारी 2012 रोजी राखीव जागांसाठीच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल व वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज 4 फेब्रुवारी 2012 पर्यंत मागे घेता येतील आणि 6 फेब्रुवारी 2012 रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. निवडणुकीची उर्वरित प्रक्रिया पूर्वनियोजनाप्रमाणे म्हणजे मतदान 16 फेब्रुवारीला, तर मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होईल. असेही श्रीमती सत्यनारायण यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

                                           0-0-0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा