मुंबईमध्ये 'टीडीआर टीबी' चे रुग्ण आढळले
नसल्याने नागरिकांनी घाबरू नये - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 19: मुंबईमध्ये 'टीडीआर टीबी' चा एकही रुग्ण आढळलेला नाही, असा केंद्रीय आरोग्य पथकाचा निष्कर्ष आहे. अशा प्रकारच्या संशयित रुग्णांवर केलेल्या उपचारांना ते रुग्ण उत्तम प्रतिसाद देत असून चौघांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरू नये, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
मुंबईतील एका खासगी हॉस्पीटलमध्ये कथित टीडीआर-टीबी रुग्ण आढळून आल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या आढावा बैठकीस आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव जे. के. बाँठीया, मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार, अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर, केंद्रीय आरोग्य तज्ज्ञांच्या पथकातील डॉ. प्रल्हाद कुमार, डॉ. अंजली रामचंद्रन, डॉ. धिंग्रा, आरोग्य संचालक डॉ. गुप्ता, वैद्यकीय शिक्षण संचालक श्री. शिंगारे, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, केईएमचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, लिलावतीचे डॉ.नरेंद्र त्रिवेदी, डॉ. डगावकर आदींसह मुंबईतील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, राज्य सरकार व मुंबई पालिकेकडून सुरू असलेली टीबीवरील उपचारांची दिशा योग्य आहे. कोणत्याही औषधोपचारांना दाद न देणारा असा कोणताही टीबी अस्तित्वात नसल्याचा निष्कर्ष केंद्रीय आरोग्य तज्ज्ञांच्या पथकाने काढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावु नये. केंद्र शासनाच्या मदतीने टीबीच्या रुग्णांसाठी मोफत औषधोपचार दिले जातात. अर्धवट औषधोपचारामुळे अशा रुग्णांना संसर्गाची भिती असते. नागरिकांमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आढळून आलेल्या टीबी रुग्णांशी संबधित संपुर्ण माहिती जाणून घेतली. हा आजार नेमका कायआहे, कशामुळे होतो याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य पथकातील तज्ज्ञांनी यावेळी दिली.
खासगी रुग्णालयांनी केलेल्या संशोधनाला आम्ही नक्कीच श्रेय देऊ, परंतु अशा रुग्णालयांनी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला तसेच सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग योजनेच्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत औषधे उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून द्यावे. शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आपल्याकडील अशा प्रकारच्या रुग्णांची माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी यावेळी केले. अतिरिक्त मुख्य सचिव जयंतकुमार बाँठीया म्हणाले की,
हिंदुजा हॉस्पिटलात आढळलेल्या 12 डीआर टीबी रुग्णांपैकी सात जणांची तपासणी केली असताना त्यातील चार रुग्ण औषधांना प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले तर इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. क्षयरोग निदानाच्या सुविधा व उपचार सर्वत्र मोफत उपलब्ध आहे. खासगी डॉक्टरांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असेही श्री. बाँठीया यांनी सांगितले.
हिंदुजा हॉस्पिटलात आढळलेल्या 12 डीआर टीबी रुग्णांपैकी सात जणांची तपासणी केली असताना त्यातील चार रुग्ण औषधांना प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले तर इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. क्षयरोग निदानाच्या सुविधा व उपचार सर्वत्र मोफत उपलब्ध आहे. खासगी डॉक्टरांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असेही श्री. बाँठीया यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती आयुक्त सुबोधकुमार यांनी यावेळी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा