राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जागृती अभियान
-नीला सत्यनारायण
मुंबई, दि. 21 : महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन 25 जानेवारी या `राष्ट्रीय मतदार दिवसा`निमित्त सप्ताहाभर मतदार जागृती अभियान राबवावे, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या निवडणुकीत पैसे किंवा दारूचा वापर होऊ नये यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या दक्षता समित्यांच्या मदतीने या अभियनाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी तयार केलेल्या सीडींमध्ये आवश्यक ते बदल करून या सीडी स्थानिक केबल टीव्हीवरून प्रसारित कराव्यात आणि इतर माध्यमांद्वारेही या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर मतदारांना आवाहन करणारे फलकही लावण्यात यावेत, अशा सूचनाही श्रीमती सत्यनारायण यांनी दिल्या आहेत.
विविध प्रलोभनांचा वापर करून सर्रासपणे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही उमेदवार किंवा राजकीय पक्षांकडून करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे येत आहेत. ते टाळण्यासाठी आणि या निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने या अभियानाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत एक सकारात्मक संदेश पोहचवावा, असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
0-0-0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा