रस्ता सुरक्षेसाठी सामाजिक मानसिकता
निर्माण होणे आवश्यक - मुख्यमंत्री
परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनच्या वतीने मरीन ड्राईव्ह येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री, आर. आर. पाटील, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, अपर मुख्य सचिव (गृह) उमेशचंद्र सरंगी, प्रधान सचिव (परिवहन) डॉ. शैलेशकुमार शर्मा, पोलीस आयुक्त अरुप पटनायक, परिवहन आयुक्त व्ही. एन मोरे, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनचे नितिन दोसा आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक वेळा समोरच्याच्या चुकीने अपघात होऊन नागरिकांचा दोष नसताना जीवितहानी होते. तसेच जर सुरक्षा केली असती तर विविध अपघातात प्राणहानी टाळता आली असती असेही अपघातानंतर लक्षात येते. अशा सर्व अपघातांची कारणमिमांसा व त्या संदर्भातील सुस्पष्ट आकडेवारी जनतेसमोर आली पाहिजे. त्यामुळे देखील जनजागृती होईल. वाहनांची संख्या जरी दहा टक्क्यांनी वाढत असली तरी रस्ते अपघातात ती टक्केवारी कमी आहे. ही चांगली बाब आहे. तथापि विविध उपाययोजनांचा वापर करुन रस्ते अपघात टाळता येऊ शकतात. याबाबत परिवहन व पोलीस विभागाने दक्ष राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन आपला जीव वाचवावा. कारण हा जीव अत्यंत महत्त्वाचा आहे तसेच स्वत:हून वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्यामुळे निश्चितच अपघात कमी होण्यास मदत होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. जनजागृतीसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागांना शासनाच्यावतीने भक्कम आर्थिक पाठबळ राहील अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
वाहन अपघातात होणारे तरुण पिढीचे नुकसान हे पर्यायाने देशाचे मोठे नुकसान असून वाहन अपघाता संदर्भात विचार होणे आवश्यक असल्याचे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. केवळ
रस्ता सुरक्षेबाबत सप्ताह न पाळता पंधरवडा व त्यानंतरही सातत्याने ही मोहिम शाळा, महाविद्यालये, कारखाने, विविध आस्थापना याठिकाणी राबविण्यात येत असून त्यास नागरिकांनी मोठया प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी दीपप्रज्वलनानंतर मुख्यमंत्री व पाहुण्यांच्या हस्ते 23 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान 2012 ची पुस्तिका तसेच शालेय स्कूल बस धोरणाची माहिती पुस्तिका आणि काही वृत्तचित्रफितींचे प्रकाशन करण्यात आले. या वर्षाचे घोषवाक्य "Accidents bring tears, Safety brings cheer" (अपघातात दु:ख, सुरक्षेत सुख) असे आहे. यावेळी चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात परिवहन विभागासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून योगदान देण्याची तयारी दर्शविली.
परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा पंधरवडा व महाराष्ट्रातील रस्ते अपघात आणि उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 1 ते 7 जानेवारी दरम्यान `रस्ता सुरक्षा सप्ताह` पाळला जातो. मात्र, रस्ता सुरक्षा सदंर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने 1 ते 15 जानेवारी असा `रस्ता सुरक्षा पंधरवडा` पाळण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे त्यांनी सांगितले. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनचे नितिन दोसा यांनी आभार मानले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा