आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने
सहकारी संस्थांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 2 : राज्यातील सहकारी संस्थांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2012 च्या निमित्ताने आत्मपरिक्षण करण्याची व आपल्या कामकाजात शिस्त व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची नितांत गरज असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने 2012 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. या निमित्ताने आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके, खासदार आनंद अडसूळ, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त मधुकर चौधरी उपस्थित होते.
साखर प्रक्रिया क्षेत्रात खासगी कारखाने मोठ्या प्रमाणात येत आहेत अशावेळी खासगी कारखान्यांच्या स्पर्धेंला तोंड देण्याइतपत सक्षम सहकार चळवळ राज्यात उभी राहणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, काही कारखान्यांमध्ये असलेले आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी तसेच उत्कृष्टपणे काम करीत असलेल्या साखर कारखान्यांचे व्यवस्थापन याचा अभ्यास अडचणीतील साखर कारखान्यांनी केला पाहिजे. आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर सहकार चळवळीला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा सहकार हा कणा असल्याने सहकार चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या बोध चिन्हाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. केंद्रीय कृषी व सहकार मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यांची उच्चस्तरीय समिती हे सहकार वर्ष साजरे करण्याकरीता गठीत करण्यात आली आहे. |
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2012 मध्ये येत आहेत हा एक विलक्षण योगायोग आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, हे वर्ष साजरे करण्यासाठी लागणारा निधी सहकार संस्थांनी उभा करावा. राज्य शासनातर्फे काही प्रमाणात सहाय्य देण्यात येईल.
राज्यात या वर्षी मोठी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे असे सांगून सहकार मंत्री पुढे म्हणाले की, सहकार संस्थांशी निगडीत अशा विषयांवर सहकार विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार असून सहकारी चळवळीची सध्याची स्थिती व त्या चळवळीचे भवितव्य याबाबत यामध्ये माहिती उपलब्ध होणार आहे. सहकार स्मरणिकेत काही मान्यवरांच्या मुलाखती व यशस्वी सहकार संस्थांच्या यशोगाथा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा