रविवार, १८ डिसेंबर, २०११


 विदर्भातील शेतक-यांच्या शाश्वत
उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन - मुख्यमंत्री 
मोझरी विकास आराखडा व उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन

अमरावती, दि. 18 : निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बरेचदा त्याचा कृषी उत्पादनालाही फटका बसतो. अशा परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी विविध माध्यमांव्दारे त्यांचे शाश्वत उत्पन्न वाढविणे आवश्यक असून त्यासाठी शासनाच्यावतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही शेतीबरोबर विविध प्रकारच्या जोडधंद्यांना चालना द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मोझरी येथे 125 कोटी रुपये खर्च करुन राबविण्यात येणारा मोझरी विकास आराखडा आणि 175 कोटी रुपयांच्या गुरुकुंज मोझरी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी, इतर मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष कैलाश कुमोद, आमदार यशोमती ठाकुर, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष संतोष महात्मे, माजी आमदार भैय्यासाहेब ठाकुर, विभागीय आयुक्त एन. नवीन सोना, जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, डॉ. राजेंद्र गवई, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी बबनराव वानखडे, दामोदर पाटील आदी उपस्थित होते.
विदर्भातील कापूस, सोयाबिन व धान उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी मदत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी लागणार आहे. त्यासाठी शासन सिंचन, सूक्ष्म सिंचन, पीक विमा व अन्य माध्यमांद्वारे भर देत आहे. शेतक-यांसाठी विविध प्रकारच्या पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पावसाने दगा दिल्यास विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतक-यांना मदत मिळू शकेल. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांनी केवळ शेतीच्या भरवश्यावर न राहता शेतीला जोड उत्पन्नाची साधने निर्माण केली पाहिजे. दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढीपालन यासारखे जोड धंदे सुरु केले पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

राज्याच्या सुवर्णमहोत्सवीवर्षानिमित्त शाश्वत विकासासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी सिंचन अतिशय महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने मोझरी उपसा सिंचन योजना घेण्यात आली आहे. 125 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी विकास आराखडा राबविण्यात येत असून यामुळे परिसरात भौतिक सुविधा निर्माण होणार आहे. या आराखड्यातून तुकडोजी महाराजांची दृष्टी व त्यांचे विचार सर्वोतोपरी पोहोचविण्याचा प्रयत्न असून जनतेनेही या कामासाठी सहकार्य करावे.  
मोझरी हे गाव तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. राष्ट्रसंतांची प्रेरणा सतत आम्हाला मिळत राहील. महाराजांचाच विचार घेऊन विकासाचे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. मोझरी हे आदर्श गाव व्हावे आणि या गावाचा संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यातील अविकसित भागाचा विकास करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शासनाने मानवी विकास अभियान सुरु केले असून अमरावतीसारख्या जिल्ह्यांना त्याचाही फायदा मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार
      विदर्भातील शेतक-यांचा सिंचनाचा प्रश्न सुटल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही, याची जाणीव असल्यानेच सिंचन प्रकल्प हाती घेतल्या जात आहे. मोझरी उपसा सिचन योजनेतून परिसरातील 16 गावातील शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे, असे याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
      लोकसहभाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता अभियान आम्ही राबविले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध विकास प्रकल्प सुरु केले. तिर्थक्षेत्राची कामे घेतली. भाविकांना तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. संत तुकडोजी महाराजांच्या जन्म शताब्दीनिमित्त मोझरी विकास आराखडा हाती घेतला. यामुळे मोझरी व परिसराचा विकास होणार आहे. महाराजांचा संदेश देशात पोहचण्यासाठी आराखड्यात स्वतंत्र विचार करण्यात आला आहे. मात्र स्थानिकांच्या सहभागाशिवाय हे कार्य शक्य नाही. आम्ही आर्थिक पाठबळ देऊ परंतु स्थानिक जनतेने सहभाग द्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आमचा प्रयत्न राहीला आहे. शेतमालाच्या आधारभूत किंमती वाढल्या पाहिजेत, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला. शेतक-यांना 1 लाखापर्यंत शुन्य तर 1 ते 3 लाखापर्यंत केवळ 2 टक्के दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. शेतक-यांना सावकाराच्या दारात जावे लागू नये असा प्रयत्न आहे. शेतक-यांनीही कर्जाची नियमित परतफेड करुन आर्थिक शिस्त लावावी. विदर्भात कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे रहावेत. महिला, तरुणांना रोजगार मिळावा, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी लवकरच वस्त्रोद्योग धोरण आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शेतकरी तसेच गोरगरीब ताठ मानेने जगले पाहिजे असे सांगून शेतक-यांनी पिकांचे चांगले व दर्जेदार उत्पन्न घ्यावे. चांगले भाव देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशिल राहील, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
आपल्या प्रस्ताविक भाषणात आमदार यशोमती ठाकुर यांनी मोझरीप्रमाणचे वलगाव विकास आराखडा व भातकुली, तिवसा या खारपट्याच्या विकासासाठी उपसा सिंचन योजना राबवावी, अशी विनंती केली. तसेच मोझरी विकास आराखडा व उपसा सिंचन योजनेबद्दल माहिती दिली. सुरुवातीस अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी बबनराव वानखडे यांनी स्वागतपर भाषण केले. या प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचा मोझरी वाशियांच्यातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी अपंगांना तिनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला परिसरातील गावांचे सरपंच, लोकप्रतिनीधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ज्योती तोटेवार यांनी केले तर आभार सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता शिवकुमार गिरी यांनी मानले.
0000000

                                                                                 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना
मुख्यमंत्र्यांची भावपूर्ण आदरांजली

अमरावती, दि.18 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी येथील समाधीस्थळाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन आपली भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
      मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळावर गुलाबपुष्प अर्पण केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, आमदार यशोमती ठाकुर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, विभागीय आयुक्त एन. नवीन सोना, जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल आदी उपस्थित होते.
      उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळावर गुलाबपुष्प अर्पण करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गुरूदेव सेवा आश्रमात सुरु असलेल्या विविध धार्मिक व शैक्षणिक उपक्रमाची माहिती घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सर्वधर्म समभावाची शिकवण सर्वांना दिली. प्रार्थना मंदिरातही विविध धर्माच्या धर्मगुरुचे 36 छायाचित्र महाराजांच्या सूचनेवरुनच लावण्यात आल आहेत.
प्रत्येकाने आपल्या धर्माची प्रार्थना मनोभावे कराव, यासाठी विश्वमंदिराची संकल्पना साकारली असून आजही येथे दररोज सकाळी व सायंकाळी हजारो भाविक एकत्र येऊन महाराजांची प्रार्थना एकत्रितपणे करतात. हा उपक्रम अखंडपणे सुरु असल्याचे सर्वाधिकारी बबनराव वानखडे यांनी सांगितले.
विश्वमंदिराला भेट
      मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वमंदिराला भेट दिली व आपली भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
      यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी उपस्थित होते. विश्वमंदिरासमोर तिर्थकुंड असून या तिर्थकुंडात सर्व भाविक अस्थिंचे विसर्जन करतात. या तिर्थकुंडाची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली.
      प्रारंभी सर्वाधिकारी बबनराव वानखडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी दामोदरराव पाटील, जनार्दन बोथे, उषाताई हजारे, महादेव मेटकर, डॉ. रघुनाथ वाडेकर आदी विश्वस्त उपस्थित होते.
*****


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा