रविवार, १८ डिसेंबर, २०११



राज्यातील दोन कोटी नागरिकांना
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे कवच
-          मुख्यमंत्री
-           
                  * देशातील पहिल्या आरोग्य विषयक महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ
                  * 1 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या कुटूंबांना सर्व आरोग्य सुविधा
     * मुख्यमंत्र्यांच्याहस्ते कुटूंबांना आरोग्य पत्राचे वाटप

अमरावती दि. 18- ग्रामीण भागातील गरीब रुग्णांचे प्राण वाचविणा-या तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घेणा-या देशातील पहिल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे राज्यातील 50 लाख कुटूंबांना आधार मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
      राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. पहिल्या टप्प्यात राज्यातील 8 जिल्हयामध्ये ही योजना सुरू झाली असून 2 कोटी लोकसंख्येला याचा लाभ मिळणार आहे.
      संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी, सार्वजनिक आरोग्य व महिला बालविकास मंत्री श्रीमती फौजिया खान, महापौर किशोर शेळके उपस्थित होते.
      एखादा गंभीर आजार झाला तर संपूर्ण कुटूंबावर त्याचा परिणाम होतो. आजाराचा खर्च भागविणे अशक्य झाल्यामुळे संपुर्ण कुटूंब उध्‍वस्त होऊ शकते. अशा कुटूंबांना आधार देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यात प्रथमच सुरु करण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 8 जिल्हयात ही योजना सुरू करण्यात आली असली तरी संपूर्ण राज्यात ही महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. या योजनेसाठी लागणारा संपूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

      राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही संपूर्णपणे नावीण्यपूर्ण असून यामध्ये 972 आजारांचा व 121 सेवांचा समावेश राहणार आहे. आरोग्य योजनेच्या तक्रार निवारणसाठी स्वतंत्र सुविधा राहणार असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील केशरी व पिवळे कार्डधारक असलेल्या सर्वच कुटूंबांना मिळणार असल्याचेही मुख्यमत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
      राज्यातील मागास भागांच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मानवी निर्देशांमध्ये अमरावती विभाग मागे आहे. या विभागाच्या विकासासोबतच शाश्वत शेती व सिंचनाच्या सुविधा वाढविण्यावर विशेष भर राहणार आहे. शेतक-यांना मदत देण्याचे शासनाचे धोरण असून कापूस उत्पादकांसह इतर पिकांसाठी 2 हजार कोटी रुपयांचे पॅकेल जाहीर करण्यात आले आहे.
       मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वंयसेंवी संस्था आणि शासकीय यंत्रंणानी एकत्रपणे प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच मुलींचे घटते प्रमाण थांबविवण्यासाठी जागृती निर्माण करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केल्यात.
      उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्ष भाषणात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ग्रामीण भागातील अत्यंत गरीब रुग्णांना नवीन जीवन मिळणार असून आरोग्य पत्र गरीब, निराधार , विधवा भगिनींसाठी कुटूंबाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमधील एकही लाभार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतांनाच निर्धारीत केलेल्या रुग्णालयामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील याची विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      आम आदमीला चांगल्या व दर्जेदार सुविधा पुरविण्याचे आघाडी शासनाचे धोरण असल्याचे स्पष्ट करतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतक-यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न असून शेतक-यांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन आत्महत्या करु नयेत, असे आव्हान करतांना सिंचनाच्या सुविधासोबतच उत्पादित होणा-या कृषीमालावर प्रक्रीया करणारी कारखानदारी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न राहणार आहेत. कापूस उत्पादक शेतक-यांसाठीही स्वतंत्र वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
       आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी एक लाखापर्यंत उत्पन्न असलेल्‍या कुटूंबांना आरोग्य सुविधा पुरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. येत्या दोन महिण्यात सर्वांना आरोग्यपत्र देण्यात येणार अशी ग्वाही त्यांनी दिली.
      आरोग्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांनी आर्थिक परिस्थिती अभावी उपचार करु न   शकणा-यांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील कुटूंबांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य मित्र कर्मचारी राहणार असून जनतेनेही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान त्यांनी केले.
      प्रारंभी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची माहिती दिली. ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ही योजना असून दुर्धर आजारावर उपचारासाठी यापूर्वीच्या योजनेत बदल करुन अधिक व्यापक प्रमाणात ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
      मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते अमरावती जिल्हयातील अजाबराव दुसाजी वंजारी यांचेसह 20 कुटूंबांना आरोग्यपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी धारणी तालुक्यातील आदिवासी बंन्सीलाल मावस्कर, फुलाबाई बळीराम सहारे आदी निराधारांनाही आरोग्य पत्राचे वितरण करण्यात आले.
      स्वागत सार्वजनिक आरोग्य सचिव भूषण गगरानी तर आभार प्रदर्शन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्येंकटेशन यांनी केले.
      यावेळी आमदार. प्रा. वीरेंद्र जगताप, श्रीमती यशोमती ठाकूर, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, रवी राणा, राजमाता जिजाऊ अभियानाचे संचालक विकास खारगे, जि. प. अध्यक्ष बबलू देशमुख, विभागीय आयुक्त एन. नवीन सोना, जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख आदीसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

                                                                        *****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा