सोमवार, १९ डिसेंबर, २०११



मिहानमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन
देशासमोरील आदर्श उदाहरण - मुख्यमंत्री
टाटा कन्सल्टन्सीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कॅम्पसचे भूमिपूजन

     नागपूर, दि. 19 : मिहानमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे संपुर्ण देशासमोरील पुनर्वसनाचे एक आदर्श उदाहरण आहे. मिहान सेझ प्रकल्प हा केवळ विदर्भ किंवा महाराष्ट्राच्यादृष्टीनेच नव्हे तर देशाच्या आर्थिक औद्योगिक विकासाच्यादृष्टीने मोठी झेप ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
      मिहान सेझमधील टाटा कन्सल्टन्सीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कॅम्पसच्या भूमिपूजन समारंभातब् ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, टाटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन वित्तीय अधिकारी महालिंगम यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टीसीएस कॅम्पसची कोनशीला ठेवण्यात आली.
      मुख्यमंत्री म्हणाले की, मिहान प्रकल्पासाठी चार हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून 146  हेक्टर जमिनीचे भूसंपादन बाकी आहे. ही जमीन लवकरच  संपादित करण्यात येईल. मिहानमधील विस्थापितांचे पुनर्वसन देशासमोरील उत्कृष्ट उदाहरण असून त्यांना भूसंपादनापोटी सर्वाधिक मोबदला देण्यात आल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मिहानमध्ये जास्तीत जास्त उद्योगांनी यावे. त्यांना शासन सर्व मूलभूत सोयीसुविधा पुरवेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 
      टाटा कन्सल्टन्सीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कॅम्पसमुळे या भागातील आयटी तरुणांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून टाटाने हा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
        जगभरात मंदीची लाट असली तरी भारताची अर्थव्यवस्था अजुनही मजबुत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक विकासात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. याठिकाणी कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे  उद्योगांना त्याचा भरपूर फायदा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.
      टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा हा प्रकल्प यशस्वी होईल, अशा शुभेच्छा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी यावेळी दिल्या.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्युशन या क्षेत्रात अग्रणी कंपनी असून ती नागपुरात नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कॅम्पस उभारणार आहे. 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन पहिल्या टप्प्यात  8200 नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
      24 महिन्यात प्रकल्प पुर्ण करण्याचा प्रयत्न असून या अत्याधुनिक कॅम्पस सुविधेत दोन टप्प्यात 16 हजार व्यक्तिंना सामावून घेण्यात येईल. जागतिक दर्जाच्या कार्यालयासोबतच या टीसीएस कॅम्पसमध्ये कोलॅबरेशन सेंटर, कॅफेटेरिया, व्यायामशाळा आणि आऊटडोअर स्पोर्टस सुविधा असणार आहेत. 
      उपस्थितांचे आभार वित्तीय अधिकारी महालिंगम यांनी मानले. या कार्यक्रमास मिहानचे व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस. मदान, विभागीय आयुक्त व्ही. गोपाल रेड्डी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे जिल्हाधिकारी सौरभ राव यांचेसह मिहानचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा