बॉक्सिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय खेळाडु तयार होतील- मुख्यमंत्री
पुणे, दि. 26 : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रातून देशाच्या लौकिकात भर टाकणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंगच्या क्षेत्रात खेळाडू तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
येथील भवानीपेठेत असलेल्या जनरल अरूणकुमार वैद्य स्टेडियममध्ये सुरू करण्यात आलेल्या आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. या प्रसंगी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाजेड, महापालिका आयुक्त महेश पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध खेळांच्या विकासासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी राज्य शासनातर्फे पायाभूत सोयी पुरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तालुका, जिल्हा व विभागीय पातळीवरील स्टेडियमच्या बांधकामासाठी आर्थिक निधी वाढवून देणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नैपूण्य मिळालेल्या खेळाडूंना आर्थिक साह्य देणे आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत. बॉक्सिंगसारख्या क्रीडा प्रकारात नामवंत खेळाडूतयार होण्यास सर्व सोईनियुक्त अशा या केंद्रामुळे मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही समयोचित भाषण झाले. आमदार रमेश बागवे यांनी आपल्या प्रास्ताविकात जनरल अरूणकुमार वैद्य स्टेडियम या ठिकाणी राज्य शासनाने विशेष निधी अनुदान योजनेतून सुमारे 4 कोटी रूपये खर्च करून भारतात प्रथमच असे सर्व सोईनियुक्त अत्याधुनिक बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. शेवटी अविनाश बागवे यांनी आभार मानले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा