दुबे यांच्या निधनाने अर्धशतकाची नाट्यसेवा
करणारा निष्ठावंत, श्रेष्ठ रंगकर्मी गमावला
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 25 : रंगभूमीवर आत्यंतिक निष्ठा आणि प्रेम असलेले आणि अर्धशतक रंगभूमीची सेवा केलेले ज्येष्ठ रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले असून आम्ही एक श्रेष्ठ रंगकर्मी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पं. सत्यदेव दुबे हे नाट्यवेडाने झपाटलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रायोगिक-समांतर रंगभूमी आणि मुंबई हीच आपली कर्मभूमी मानली होती. पं. दुबे हे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली. मराठी रंगभूमीवरील त्यांचे योगदान मोलाचे आहे. `आधे अधूरे`, `अंधा युग`, `हयवदन` यासारखी त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके गाजली आहेत. ते सातत्याने नाटके करीत असत. कारण रंगभूमी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. नवे कलाकार घडावेत, यासाठी ते झपाटलेले होते. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक, अभिनेते घडले. मराठी, हिंदी रंगभूमीवरील अनेक कलाकार आज आपण दुबे स्कुलचे विद्यार्थी आहोत, असे अभिमानाने सांगतात. यातच त्यांची थोरवी आहे.
--0--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा