एस टी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड” मुळे
प्रवाशांना आधुनिक सुविधा - मुख्यमंत्री
प्रवाशांकरीता “स्मार्ट कार्ड” योजनेचा शुभारंभ
नागपूर, दि. 15 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशाकरीता सुरु केलेली “स्मार्ट कार्ड” योजना ही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रवाशांच्या सुविधासाठी सुरु केलेला महत्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
रामगिरी येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या “स्मार्ट कार्ड” योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत, प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, अजितकुमार जैन, एस.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डचा वापर प्रवाशांना आवडेल तेथे प्रवासासोबत प्रवासी मासिक पास योजनेसाठी होईल. स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांनी एकदा पैसे भरले की मोबाईलप्रमाणे स्मार्ट कार्डचा वापर करता येईल असे यावेळी म्हणाले.
एस टी महामंडळाने सर्व सुविधांचे आधुनिकीकरण करुन प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महामंडळाला केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता येईल व गैरप्रकारांनाही आळा बसू शकेल. स्मार्ट कार्डची योजना सर्वच प्रकारच्या प्रवासासाठी सुरु करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा म्हणाले प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना आवडेल तेथे प्रवासासाठी असून दुस-या टप्प्यात विद्यार्थी पासेस व प्रवासी मासिक पास धारकांसाठी लागू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे राज्यातील कुठल्याही बसस्थानकावरुन स्मार्ट कार्ड मध्ये पैसे भरुन प्रवास करणे यामुळे होणार आहे.
प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी स्वागत करुन प्रस्ताविकात केलं. स्मार्ट कार्ड च्या सुविधेमुळे प्रवाशांच्या वेळात बचत होणार असून सहज व सुलभ नुतनीकरण होईल. हिशोबात अचुकता तसेच विश्लेषणात्मक अचूक माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
यावेळी विभागीय नियंत्रक सुर्यकांत अंबाडिकर, विभागीय नियंत्रक आर.डी घाटोळे, एस.एम. जगताप, ट्रायसेमचे कलिम शेख, राहूल राऊत, राजेश दातेवार आदी उपस्थित होते.
******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा