राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
नागपूर, दि. 13 : राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे आयोजित संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन उद्या बुधवार, 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे अभ्यासवर्ग 14 ते 21 डिसेंबर, 2011 पर्यंत असून त्यात संसदीय कार्यप्रणालीशी संबंधित व्याख्याने मान्यवर देणार आहेत. सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत ही व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या स्थापनेपासून (सन 1952) शाखेतर्फे संसदीय लोकशाही शासन प्रणालीच्या बळकटीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशा विविध उपक्रमांपैकीच एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे नागपूर अधिवेशन कालावधीत "राज्यशास्त्र" व "लोकप्रशासन" विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सन 1964 पासून संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन केले जात आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे सह अध्यक्ष असलेले सभापती शिवाजीराव देशमुख, अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उपसभापती वसंत डावखरे, उपाध्यक्ष वसंत पुरके, विधानसभा सदस्य सुभाष देसाई, विधानसभा सदस्या श्रीमती यशोमती ठाकूर, श्रीमती पंकजा मुंडे-पालवे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे, नागपूर दै. सकाळ आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, प्रा. डॉ. विजय वाघुले आणि अन्य मान्यवर व्याख्याने देणार आहेत. राज्यातील नऊ विद्यापीठांचे 70 विद्यार्थी व प्राध्यापक या अभ्यासवर्गात सहभागी होणार आहेत.
दुपारच्या अनौपचारिक सत्रांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या मान्यवर सदस्यांची तसेच मंत्री महोदयांची विद्यार्थ्यांबरोबर थेट भेट घडवून आणली जाते व परस्पर संवाद साधला जातो. या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ विधानपरिषद सदस्य उल्हासदादा पवार हे करणार आहेत. या अभ्यासवर्गास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन (विधान मंडळाचे) प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी केले आहे.
0 0 0 0