विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचा
वंदे मातरम्ने शुभारंभ
नागपूर, दि. 12 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज येथे वंदे मातरम्ने शुभारंभ झाला. यावेळी विधान परिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि विधानपरिषद सदस्य, तसेच विधानसभेत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष वसंत पुरके, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.
000
दिवंगत माजी सदस्यांना विधानपरिषदेत आदरांजली
नागपूर, दि. 12 : विधानपरिषदेचे माजी सदस्य गणपती दादा लाड आणि श्रीमती मालतीबाई रामराव सरनाईक यांच्या निधनाबद्दल आज विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
सभापती शिवाजीराव देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, विधानपरिषद सदस्य दिवाकर रावते, कपिल पाटील यांनी या दिवंगत सदस्यांप्रती आपल्या शोक भावना व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.
000
सभापती तालिका जाहीर
नागपूर, दि. 12 : विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री मोहन जोशी, रमेश शेंडगे, परशुराम उपरकर, भगवान साळुंखे यांची निवड करण्यात आली असल्याचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी विधानपरिषदेत जाहीर केले.
000
दिवंगत माजी सदस्यांना विधानसभेत आदरांजली
नागपूर, दि. 12 : विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय नारायण पाटील, माजी सदस्य सर्वश्री गणपती दादा लाड, विठ्ठल रामराव उर्फ बापूसाहेब काळदाते, शशिशेखर काशिनाथ आठल्ये, रामराव नारायण यादव (लोणीकर), गजानन शंकर लोके, नारायणभाऊ बहेकार, भाऊसाहेब दगडूराव देशमुख, नवनीतभाई नारायणदास बार्शीकर व हनुमंतराव दौलतराव बोबडे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडून त्यांना आदरांजली वाहीली.
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, वन मंत्री पतंगराव कदम, सदस्य सर्वश्री बाळा नांदगावकर, गिरीष बापट यांनी या दिवंगत सदस्यांप्रती आपल्या शोक भावना व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.
000
शहीद बाबू गेनू यांना मुख्यमंत्र्यांची आदरांजली
नागपूर, दि. 12 : विदेशी वस्तूंची होळी करुन स्वदेशीसाठी शहीद झालेले बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज हैद्राबाद हाऊस येथे त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितिन राऊत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री सुरेश शेट्टी, महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांनी शहीद बाबू गेनू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
*******
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा