रविवार, ११ डिसेंबर, २०११


हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्यावर भर
- मुख्यमंत्री
19 विधेयके सादर केली जाणार

     नागपूर, दि. 11 : उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात नवीन बारा  आणि प्रलंबित असलेली सात अशी 19 विधेयके सादर केली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रामगिरी येथे दिली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजिलेल्या चहापान कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी सांसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते.

     हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकात नागपूर शहर, मुंबई प्रांतिक महानगरपालिका (सुधारणा) नागपूर शहर महानगरपालिका (निरसन) विधयक 2011, मुंबई मुद्रांक (सुधारणा) विधेयक 2011, मुंबई प्राथमिक शिक्षण आणि महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) विधयक 2011, मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती (दुसरी सुधारणा) विधेयक (स्वच्छालयाच्या वापरासंबंधी प्रमाणपत्र सादर करावयाच्या मुदतीत वाढ करणे) यासह अन्य महत्वाची विधेयके सादर केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
     नागपूरचे अधिवेशन प्रामुख्याने विदर्भातील प्रश्न सोडविण्यासासाठी असल्यामुळे कापूस, सोयाबीन, धान यासारख्या प्रश्नावर विधीमंडळात प्रामुख्याने चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येणार असून त्याअनुषंगाने विदर्भ विकास शेतकऱ्यांच्या प्रश्नास प्राधान्य देण्यात येईल. पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रीगट समितीने दिलेल्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.

0000000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा