क्षेपणास्त्र निर्मितीच्या प्रकल्पामुळे
औद्योगिक विकासाला गती मिळेल
- राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
अमरावती, दि. 11 भारत डायनॅमिक्स लिमिटेड या क्षेपणास्त्र निर्मितीच्या प्रकल्पामुळे अमरावतीबरोबरच विदर्भाच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्पाची अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी राष्ट्रपती बोलत होत्या.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन, डॉ. देवीसिंह शेखावत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री एम.एम. पल्लम राजू, सरंक्षण खात्याचे क्षेपणास्त्र प्रणाली विभागाचे संयुक्त सचिव पी.के. मिश्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, या प्रकल्पामुळे अमरावती परिसरातील लोकांसाठी रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. विदर्भाच्या विकासातील तूट भरुन काढण्याच्या निकडीच्या गरजा पूर्ण करता येऊ शकतील. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात कुशल व अकुशल कर्मचारी वर्ग लागणार आहे. यासाठी येथील तरुणांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सहकार्य केले आहे. राज्यातील औद्योगिक विकासासाठी राज्यशासन अग्रेसर आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या मोठ्या प्रकल्पासाठी राज्य शासनाने पुरेशी जमीन उपलब्ध करुन दिली. तसेच मेगा प्रकल्पाला दिल्या जाणा-या आर्थिक व बिगर आर्थिक प्रोत्साहनपर सवलती देखील देऊ केल्या आहेत, असे सांगून राष्ट्रपतीनी राज्य शासनाची प्रशंसा केली.
भारत हा शांतताप्रिय देश आहे. आपणास शेजारील राष्ट्रासोबत परस्पर आदर राखून एकमेकांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप न करता शांती आणि सद्भावाने राहायचे आहे. आपल्या देशाचा विकास आणि समृध्दी हा आपला उद्धेश आहे. परंतु आपल्या सिमा सुरक्षित न ठेवता कोणताही देश समृध्द होऊ शकत नाही. सुरक्षा हा प्राथमिक आधार आहे. एक मजबूत सेना आणि दरारा हा शांततेसाठी आवश्यक असतो, असे सांगून राष्ट्रपतींनी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शस्त्र सज्जतेवर आपला भर असल्याचे सांगितले.
जगामध्ये वेगाने होणा-या बदलाबरोबर गती राखण्यासाठी लष्कराने देखील स्वत:ला अद्यावत करुन त्यांच्या शस्त्रास्त्रांना आधुनिक बनविले पाहिजे, असे सागून राष्ट्रपतींनी हा प्रकल्प सैन्याच्या अशा गरजा भविष्यात पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आणि भारत डायनॅमिक्स्ा लिमिटेडला त्यांच्या प्रयत्नासाठी आणि देशहितासाठीच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी औद्योगिकरणाची गरज अधोरेखित करतांनाच शासनाने कोरडवाहू शेतक-यांच्या प्रश्नाकडेही विशेष लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
राज्यपाल के. शंकरनारायणन यांनीही यावेळी भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीच्या कामाचे कौतूक करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मोठा प्रकल्प राष्ट्रपतींच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात येऊ शकला असल्याचे सांगून राज्य शासन या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य करेल. प्रकल्पासाठी अत्यंत उपयुक्त अशी जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. चांगल्या पायाभूत सुविधा असल्यामुळे हा प्रकल्प भविष्यात लहान-मोठ्या पूरक उद्योगांनाही संधी निर्माण करुन देईल. त्यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकासामध्ये नेहमीच अग्रेसर असून औद्योगिक विकासासाठी राज्य शासन स्वतंत्र धोरण तयार करीत असल्याचे सांगून मुख्यमंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पाबद्दल संरक्षण मंत्रालयाचे विशेष आभार मानले.
राज्यमंत्री पल्लम राजू
केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री एम.एम. पल्लम राजू यांनी प्रकल्पाच्या शुभारंभाचा आजचा दिवस हा ऐतिहासिक असल्याचे सांगून सैन्याच्या सुसज्जतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्राची निर्मिती संरक्षण मंत्रालयाच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीकडून केली जात आहे. 40 वर्षापासून ही कंपनी देशाच्या सरक्षिततेसाठी नवनवीन शस्त्र आणि अस्त्र निर्माण करीत आली आहे, असेही ते म्हणाले.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीने निर्माण केलेल्या विविध क्षेपणास्त्र व पुरक साधन सामुग्रीचे प्रदर्शन दालनात मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला राष्ट्रपतीसह सर्व मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. दीप प्रज्वलनानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी कोनशिला अनावरण करण्यात आले. भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल रवी खेतरपाल यांनी पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले व त्यांनी कंपनीच्या कामगिरीची माहिती प्रास्ताविकपर भाषणात दिली.
या समारंभास खासदार आनंदराव अडसूळ, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. शेवटी एअर व्हाईस मार्शल पी.के. श्रीवास्तव यांनी सर्वांचे आभार मानले.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा