शनिवार, १० डिसेंबर, २०११



वृत्तपत्रांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखून काम करावे
-- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
नागपूर, दि.10 : लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी तसेच लोकशाहीमधील दोष उघडकीस आणण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमे कार्यरत असतात. सामाजिक बांधिलकी पोटी प्रसार माध्यमांची जबाबदारी ही अधिकच वाढलेली आहे. सबब वृत्तपत्रांनी देखील सामाजिक जबाबदारीचे भान राखून काम करावे असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतच्या लेखन व पत्रकारिता पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाषण करतांना केले.
लक्ष्मीनगर येथील सांयटिफीक सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून टाईम्स नाऊ टी.व्ही. चॅनलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मिडीया लिमिटेडचे चेअरमन व खासदार विजय दर्डा होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकमतचे पहिले संपादक पद्मश्री पा.वा.गाडगीळ स्मृती सामाजिक-आर्थिक-विकास लेखन स्पर्धेची व पत्रमहर्षी बाबा दळवी स्मृती शोध पत्रकारिता स्पर्धेची पारितोषिके मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पत्रकारांनी आचारसंहितेचे पालन करावे, याबाबत आग्रह धरला गेला तर शासन पत्रकारितेवर बंधन घालत आहे, असे म्हटले जाऊ लागते. तथापि आजकाल प्रसार माध्यमांचा प्रभाव गरजेपेक्षा अधिक वाढला आहे अशी विचारधारा समाजात वाढत आहे. तथापि वृत्तपत्रांवर वाचकांचा विश्वास अधिक असल्यामुळे, सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेमध्ये समाजाला प्रभावित करणाऱ्या विविध समस्यांबद्दलचे जागरण अभिप्रेत आहे. यासाठी विकास लेखन आणि शोध पत्रकारिता याचा फार उपयोग होत असतो. ह्या दोन्ही विषयावर सातत्याने 23 वर्षापासून स्पर्धा आयोजित करत असल्याबद्दल लोकमत वृत्तपत्र समूहाचे त्यांनी अभिनंदन केले. 
प्रारंभी टाईम्स नाऊचे मुख्य संपादक अर्णब गोस्मावी यांनी भारतीय पत्रकारितेतील बदल यावर अतिशय प्रभावी असे व्याख्यान दिले. ते म्हणाले की, याबाबतीत मी माझे वैयक्तिक अनुभव तुमच्या समोर मांडीत आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी हे सांगितले की, चांगले आणि वाईट यापैकी खऱ्याची बाजू जनतेमध्ये मांडणे हे पत्रकारितेचे कर्तव्य आहे. पत्रकांराची आणि पत्रकारितेची मानसिकता बदलल्याशिवाय समाजाला मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकणार नाही, असे ते म्हणाले.
समारंभाच्या प्रारंभी स्वागतपर प्रास्ताविक खासदार विजय दर्डा यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांना मिळालेला पा.वा. गाडगीळ स्मृती स्पर्धेचा पहिला पुरस्कार त्यांच्यावतीने नागपूर लोकमतचे कार्यकारी संपादक दिलीप तिखिले यांनी स्वीकारला. तर दुसरा पुरस्कार नागपूर लोकमत आवृत्तीचे निवासी संपादक मोरेश्वर बडगे यांनी स्वीकारला. तिसरा पुरस्कार पुण्याच्या विमल खाचणे यांनी स्वीकारला. तसेच बाबा दळवी पुरस्काराअंतर्गत लोकमतच्या सातारा येथील प्रगती जाधव-पाटील यांनी पहिला पुरस्कार तर यवतमाळ सकाळ प्रतिनिधी निलेश फाळके यांच्यावतीने सचिन खवले यांनी दुसरा पुरस्कार आणि तिसरा पुरस्कार लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला.
या कार्यक्रमाला लोकमतचे संपादक दिनकर रायकर, लोकमत समाचारचे संपादक राघवेंद्र, लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक विकास मिश्रा, लोकमत पुण्याचे संपादक विजय बाविस्कर, लोकमत नागपूरचे समन्वयक संपादक कमलाकर धारप आदि मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुरेख संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनकर रायकर यांनी मानले.
                                                * * * * *
ज्ञानोबा-तुकाराम राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे
येत्या 13 डिसेंबर रोजी नागपूर येथे वितरण
नागपूर, दि.10 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचानलनयातर्फे देण्यात येणाऱ्या ज्ञानोबा-तुकाराम राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे येत्या 13 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार असून सोहळयाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार आहेत. तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, सांस्कृतिक कार्य मंत्री  संजय देवतळे, अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, वित्त, उर्जाउत्पादन शुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच खासदार सर्वश्री विलास मुत्तेमवार, विजय दर्डा, अविनाश पांडे, तसेच आमदार सर्वश्री नितीन गडकरी, सुधाकरराव देशमुख, एस. क्यु. जमा, श्री. नागो गाणार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या समारंभात डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुढील मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे-
रत्नाकर मतकरी-नाटक, अश्विनी भिडे-देशपांडे-कंठ संगीत, पं.भीमराव पांचाळे-उपशास्त्रीय संगीत, पं.उध्दव आपेगांवकर-वाद्यसंगीत, चित्रा नवाथे-मराठी चित्रपट, ह.भ.प.हरिभाऊ रिंगे-किर्तन/समाज प्रबोधन, रुक्मिणी अंधारे-तमाशा, शा.दादा पासलकर-शाहिरी, शमा भाटे-नृत्य, दिलीप अलोणे-लोककला, मधुकर वाकोडे-आदिवासी गिरीजन, पं.सुरेश वाडकर-कलादान.
या समारंभात स्वराली ग्रुप यांचे वृंदावन, डॉ. साधना नाफडे यांनी नृत्य दिग्दर्शित केलेल्या रचना, सनतकुमार बडे यांचे पखवाज वादन, राजाभाऊ चिटणीस यांची नक्कल, डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे कविता वाचन, संजय काशिकर दिग्दर्शित नाट्यप्रवेश, बहादुला बराडे यांचा पोवाडा, भाग्यश्री पांचाळे यांचे गझलगायन, छाया माया खुटेगांवकर यांची लावणी तसेच आर्या अंबेकर अनिरुध्द जोशी यांचे गायन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असून सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी 5.45 वाजता रसिकांनी सभागृहात स्थानापन्न व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.
!!!!!!

सांसदीय अभ्यासवर्ग 14 ते 21 डिसेंबर पर्यंत
नागपूर,दिनांक 10 :  विद्यापीठातील राज्यशास्त्रलोकप्रशासनया विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 41 व्या सांसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन दिनांक 14 ते 21 डिसेंबर या कालावधीत विधानभवन येथे करण्यात आले आहे. अभ्यासवर्गाचे उद्घाटन बुधवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते होणार आहे.
या अभ्यासवर्गाला खालील विषयावर पुढील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता, वरिष्ठ सभागृहाचे सांसदीय लोकशाहीत महत्वपूर्ण योगदान आणि सर्व राज्य विधानमंडळांमध्ये विधान परिषद सभागृह निर्मितीसाठी घटनात्मक तरतुदीची आवश्यकता या विषयावर विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख, सकाळी 9.30 वाजता  मार्गदर्शन करतील. लोकप्रतिनिधी, त्यांचा मतदार संघ आणि विकासकामांचे नियोजन या विषयावर  सांसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आपले विचार व्यक्त करतील.
शुक्रवार दिनांक 16 डिसेंबरला  सकाळी 8.30 वाजता संसदीय लोकशाहीत विरोधीपक्षांचे स्थान आणि कार्य यावर विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचे व्याख्यान होईल. सकाळी 9.30 वाजता, अर्थसंकल्प : कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्वपूर्ण साधन यावर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके हे मार्गदर्शन करतील.
रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता विशेषाधिकार आणि न्यायालयाची भूमिका यावर विधी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ.विजय वाघुले हे व्याख्यान देतील. तर सकाळी 10.30 वाजता, भारतीय संविधानाच्या संदर्भात जगातील राज्यघटनांचे तुलनात्मक विश्लेषण यावर  विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे हे आपले विचार प्रतिपादन करतील.
सोमवार दिनांक 19 डिसेंबर सकाळी 8.30 वाजता, विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसार माध्यमांची भूमिका यावर दै.सकाळचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित हे व्याख्यान देतील. सकाळी 9.30 वाजता युवावर्ग व महिलांचा राजकारणातील सहभाग यावर विधानसभा सदस्य श्रीमती यशोमती ठाकूर आणि सौ.पंकजा पालवे-मुंडे यांचे व्याख्यान होईल.
मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता विद्यमान राजकीय परिस्थितीत संयुक्त सरकारची अपरिहार्यता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आपले विचार व्यक्त करतील. तर सकाळी 9.30 वाजता, विविध संसदीय आयुधे आणि विधानमंडळातील समित्यांचे कामकाज यावर विधानसभा सदस्य सुभाष देसाई यांचे व्याख्यान आणि बुधवार दिनांक 21 डिसेंबरला सकाळी 8.30 वाजता माझ्या संकल्पनेतील महाराष्ट्राचा ग्रामविकास  या विषयावर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे व्याख्यान होईल. सकाळी 9.30 वाजता विधीमंडळ : जनतेच्या इच्छाआकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ व्यावर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
राष्ट्रकुलच्या अभ्यासवर्गाला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांना सकाळी 10.30 वाजता सभापती व अध्यक्ष यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात येईल.
                 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नागपुरात आगमन
    नागपूर,दिनांक 10 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आज रविवार,दिनांक 10 डिसेंबर 2011 रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे होते.
      विमानतळावर मुख्यमंत्र्याचे रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितिन राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी विभागीय आयुक्त्‍ा वेणु गोपाल रेड्डी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रविण दराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, यांनी ही मुख्यमंत्र्याचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर ते रामगिरीकडे रवाना झाले.
                                                * * * *

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा