शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११


विदर्भातील शेतक-यांचे प्रश्न व इंदु मिल संदर्भात
मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली 9 डिसेंबर - विदर्भातील कापूस,सोयाबीन व धान उत्पादक शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी, तसेच इंदु मिलच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांची शुक्रवारी संसद भवनात भेट घेतली. विदर्भातील शेतक-यांच्या प्रश्नाबाबत मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्याशी चर्चा करुन त्याबाबतचा निर्णय नागपूर अधिवेशनात घेण्यात येईल, अशी माहिती या भेटीनंतर संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली.
    विदर्भातील कापूस,सोयाबीन व धान उत्पादकांना हमी भाव मिळावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. यासदंर्भात काही निर्णय घेतांना केंद्रातर्फे दिशानिर्देश आणि मदत घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे यासदंर्भातील मागणी आणि नेमकी परिस्थिती पंतप्रधानांपुढे व्यक्त करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासन शेतक-याच्या मुद्याबद्दल अतिशय  संवेदनशील असून या केंद्रानेही मदत करावी.यासाठीच आज डॉ.मनमोहन सिंग यांच्‍याशी विस्तृत चर्चा झाल्याचे त्यांनी पत्रकारांना स्पष्ट केले.
      या मागणीबाबत सर्व पक्षांच्या भावनाही लक्षात घेण्यात आल्या असून गरज भासल्यास शेतक-यांच्या प्रश्नावर राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळही पंतप्रधानांची भेट घेऊ शकते, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
इंदू मिल च्या जागे बाबत केंद्राकडे
8 ऑगस्ट रोजीच मागणी
      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळावी, याबाबतची मागणी राज्य सरकारने गेल्या 8 ऑगस्ट रोजीच एका पत्राद्वारे केली असल्याचे त्यांनी आज पत्रकारांना स्पष्ट केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकार अतिशय सकारात्मक असून जमीन अधीग्रहण करण्याची बाब केंद्राच्या निर्णयावर अवलंबून आहे. याबाबत राज्य शासनाने केंद्राकडून तातडीने निर्णय व्हावा, यासाठी आपण पंतप्रधानांकडे आज आग्रही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

                                   *****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा