पेडर रोड उड्डाणपूल रद्द करण्याबाबत
कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही
- मुख्यमंत्री.
मुंबई, दि. 6 : पेडर रोड उड्डाण पूल रद्द करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. आज सकाळी सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने दक्षिण मुंबईतील विशेषत: हाजीअली परिसरातील वाहतूक कोंडी पाहता हा प्रस्तावित उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे तो रद्द करण्यात येवू नये, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले, त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अशा प्रकारे पेडर रोडचा हा उड्डाण पूल रद्द करण्याबाबत कुठलाही निर्णय शासनाने अद्याप घेतलेला नाही.या संदर्भात जनसुनावणी सुरु असून लोकांच्या भावनांचा पुरेपूर विचार करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल. पर्यावरण विषयक अटींची पुर्तता करण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाशी वेळोवेळी चर्चा करुन पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. नागरिकांना कमीत कमी त्रास होवून विकास कामे देखील झपाट्याने झाली पाहीजेत आणि त्यांचा दर्जाही अधिक चांगला असला पाहिजे अशी आपली नेहमी भूमिका असते, असेही ते म्हणाले.
या शिष्टमंडळात आमदार बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आदींचा समावेश होता.
00000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे आदरांजली
इंदू मिलची जागा स्मारकाला मिळण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 55 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दादर येथील चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि आदरांजली वाहिली. त्यानंतर झालेल्या प्रार्थनेमध्ये मुख्यमंत्री सहभागी झाले. यावेळी जलसंधारण मंत्री नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार चंद्रकांत हांडोरे, कृपाशंकर सिंह, माणिकराव ठाकरे आदींनी देखील याप्रसंगी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
इंदू मिलची जागा मिळण्याबाबत प्रयत्नशील
प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा शासन स्तरावर करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित आणि वंचित समाजाला सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले. वंचित आणि दुर्बल घटकाला प्रगतीच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून राज्य शासनही या वंचित समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा