भारतीय चित्रपटसृष्टीतला ‘एव्हरग्रीन’ नायक हरपला
n मुख्यमंत्री
मुंबई दि. ४
केवळ करमणूक हा हेतू न ठेवता, संदेश देणारा आणि नेहमी प्रयत्नवादावर विश्वास ठेवणारा एव्हरग्रीन नायक आज आपणातून गेला अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्ध अभिनेता देव आनंद यांच्या निधनाबद्धल शोक व्यक्त केला.
आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत चित्रपट निर्मितीला वाहून घेतलेल्या देव आनंद यांनी वयावर मात करीत या क्षेत्रातील आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्शच निर्माण केला आहे. भारतीय चित्रपटांच्या सुवर्णकाळात राज कपूर आणि दिलीपकुमार यांच्या जोडीने ज्यांचे नाव घेतले जात होते त्या देव आनंद यांच्या रुपाने पडद्यावरती सतत चैतन्याचा झरा वाहायचा. रुपेरी पडद्यावरचे त्यांचे नुसते दर्शन देखील प्रेक्षकांना नेहमी आनंद देऊन जायचे. दैववादावर विश्वास न ठेवणाऱ्या त्यांच्या रोमान्तिक परंतू प्रयत्नवादी नायकाने त्या काळातल्या विशेषत: तरुण पिढीला जीवनावर प्रेम करण्याचा एक संदेश दिला, जो की आजच्या पिढीलाही भावणारा आहे. देव आनंद सारख्या तजेलदार, जिवंत आणि सशक्त अभिनेत्याची आठवण दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने संवेदनशील मनाच्या हळव्या चित्रपटकारास मुकलो असून भारतीय चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण करणारा तारा निखळला आहे असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा