रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपुजन


चेंबूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन
तळागाळातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल
                                                      ---- मुख्यमंत्री

मुंबई दि. 13 : चेंबूर येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर भवनामुळे या परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होऊन, तळागाळातील बांधवांसाठी हे भवन उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
 चेंबूर येथील स्वास्तिक पार्क जवळ बांधण्यात येणाऱ्या भव्यदिव्य अशा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मेमोरियल फाऊंडेशनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, स्थानिक आमदार चंद्रकांत हंडोरे, उपमहापौर शैलजा गिरकर, मुंबई झोपडपट्टी मंडळाचे माजी सभापती वेलूस्वामी नायडू आदी मान्यवर उपस्थित होते.
 मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना, या भवनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे निश्चितपणे लोकोपयोगी असे चांगले कार्य होईल, अशा भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांनी श्री. हंडोरे यांच्या कामाबाबत प्रशंसा केली.
 केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची ही योजना अत्यंत कल्पक असून यामुळे समाजातील तळागाळाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होईल. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
 43 कोटी रुपये खर्चाचे हे भवन असून येत्या 3 वर्षात याचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल असे प्रास्ताविकात श्री. हंडोरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी या भवनामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम यात आर्ट गॅलरी, मेडिकल व लिगल एड् सेंटर, सेमिनार हॉल, आयटी सेंटर, कॉप्युटर ट्रेनिंग सेंटर, वाचनालय, विपश्यना केंद्र, कॉन्फरन्स हॉल आदीची माहिती दिली.        या प्रसंगी उपमहापौर शैलजा गिरकर यांचेही समायोचित भाषण झाले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा