अनाथ व निराधार मुलांना शासन
सर्वतोपरी सहाय्य करील - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 14 : अनाथ व निराधार मुलांना स्वबळावर स्वावलंबी होण्यासाठी संस्था करित असलेल्या प्रयत्नात शासन सर्वतोपरी मदत करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. बाल दिनानिमित्त चिल्ड्रेन्स एड सोसायटी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिन सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
निराश्रीत व अनाथ मुले विविध कारणाने मुंबईमध्ये येत असतात, मुंबईमध्ये आल्यावर त्यांचा अपेक्षा भंग होतो व ते वाईट मार्गाला लागतात. अशा मुलांना योग्यवेळी मार्गदर्शन व शिक्षण मिळाले तर ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. संस्थेची स्थापना 1927 साली झाल्यापासून संस्था अशा प्रकारच्या मुलांना सहाय्य करीत असते ही कौतुकास्पदबाबत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संस्थेच्या विविध समस्यांबाबत सकारात्म्क विचार करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या एका विद्यार्थ्यांवर करण्यात येणाऱ्या 635 रुपये खर्चात वाढ करुन 800 रुपये करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला देण्यात येणाऱ्या 825 रुपयाच्या अनुदानात 990 एवढी वाढ करण्यात आली आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांना शिधावाटप पत्रिका देण्याचाही विचार करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यार्थी आजारी पडल्यास त्याला शासकीय व महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव मान्य करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
संस्थेच्या कामाचे कौतुक करुन महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 84 वर्षापासून संस्थेने विविध क्षेत्रात नामवंत व्यक्तींना घडविले. शासन या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल.
राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान म्हणाल्या की, सर्व मुलांना शिक्षण मिळण्याच्या हक्काची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. संस्थेने शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करावी.
यावेळी आमदार नितीन सरदेसाई, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा, चिल्ड्रेन एड सोसायटीचे नियंत्रक व्ही. एल. शानबाग आदी उपस्थित होते.
0 0 0 0 0
महाराष्ट्राने क्रांतिअग्रणी सैनिक गमावला : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 14 : शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आयुष्यभर संघर्ष आणि आंदोलने करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी. डी. बापू लाड यांच्या निधनाने महाराष्ट्राने क्रांतिअग्रणी सैनिक गमावला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या लाड यांनी शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. 1942 च्या लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तासगाव, इस्लामपूर मोर्चात सहभाग घेतला. युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा फडकविण्याच्या आंदोलनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. गोवा, हैद्राबाद मुक्ती लढा, सीमा लढा तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या श्री. लाड यांनी शेतकरी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी केल्या. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि हाडाचा कार्यकर्ता आपण गमावला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा