मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०११

नक्षलविरोधी मोहिमेचा आढावा




केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला नक्षलविरोधी मोहिमेचा आढावा
रस्तेबांधणी आणि विकासकामांवर भर देण्याचे आदेश

            मुंबई, दि. 15 : गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवादीविरोधी मोहिमेत केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्याची ग्वाही देतानाच, रस्तेबांधणी आणि विकासकामांवर भर देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज राज्य सरकारला दिले. या दोन्ही जिल्ह्यांमधील नक्षलविरोधी मोहिमेचा सविस्तर आढावा त्यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
            या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, पोलीस महासंचालक के. सुब्रह्मण्यम, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक महानिरीक्षक पी. वल्साकुमार, महासंचालक के. विजयकुमार, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नागपुरचे विभागीय महसूल आयुक्त बी. वेणुगोपाळ रेड्डी, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
            पोलीस महासंचालक के. सुब्रह्मण्यम यांनी नक्षलवादी मोहिमेबाबतचे सादरीकरण केले. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांमध्ये राज्य पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या संयुक्त माध्यमातून नक्षलविरोधी मोहीम राबविली जात आहे. जे नक्षलवादी संघटना सोडून पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात, अशा शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची योजना राबविली जाते.  या योजनेला प्रतिसाद देऊन 372 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती त्यानी दिली. नक्षलवादाचा प्रभाव रोखण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही प्रकारचे परिणामकारक उपाय योजण्यात येत असल्याचे त्यंानी सांगितले.
नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी नक्षलप्रभावित भागामध्ये राज्य शासनाने एकात्मिक कृती योजनेखाली हाती घेतलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. रस्ते, अंगणवाड्या, शाळा, आरोग्यकेंद्रे, पिण्याच्या पाण्याच्या योजना, रोजगार निर्मितीचे उपाय याचीही माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमंत भांगे, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभु, गोंदियाचे जिल्हाधिकारी ए. के. झाडे, पोलीस अधीक्षक सी. के. मीना यांनी तेथील विकासकामे आणि कायदा सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.
सन 2011-12 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावाही श्री. चिदंबरम यांनी घेतला आणि समाधान व्यक्त केले.
000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा