रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

सामाजिक उद्योजकता पुरस्कार


प्रकल्पांमुळे होणाऱ्या समाजशास्त्रीय
परिणामांचा विचार व्हावा : मुख्यमंत्री
          मुंबई, दि. 13 : मोठ्या प्रकल्पांमुळे नैसर्गिक पर्यावरणावर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम त्या परिसरातील सामाजिक स्वास्थ्यावर होतो. म्हणुनच पर्यावरणीय आघात अहवालाप्रमाणेच प्रकल्पांच्या समाजशास्त्रीय परिणामांचाही अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
            ज्युबिलंट भारतीय फाऊंडेशन आणि श्वाब फाऊंडेशन फॉर सोशल आंत्रप्रुन्यरशिप यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सोशल आंत्रप्रुन्यर ऑफ दि इयर 2011 (सामाजिक उद्योजकता पुरस्कार) या पुरस्कार वितरण समारंभात श्री. चव्हाण यांनी ही सुचना करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या विचाराचे स्वागत केले. कार्यक्रमाला केंद्रीय नियोजन राज्यमंत्री अश्विनीकुमार, श्वाब फाऊंडेशनचे प्रोफेसर क्लॉस श्वाब, ज्युबिलंट भारतीय फाऊंडेशनचे श्याम भारतीया, शोभना भारतीया, सामाजिक कार्यकर्ते राजीव खंडेलवाल, नियोजन आयोगाच्या सदस्य सचिव सुधा पिल्लई आदी मान्यवर उपस्थित होते.
            जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने होत आहे, तसाच तो भारतामध्येही होत आहे, असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, विकासामध्ये प्रकल्पांचे योगदान मोठे असते. त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. असे असले तरीही प्रकल्पांसाठी जमिन अधिग्रहीत करताना, उद्योगांसाठी पाणी देताना लोकांचा प्रचंड विरोध होतो. लोकांमध्ये असलेल्या संतापाचे कारण संपत्तीचे विषम वाटप हेच आहे. यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होते. प्रकल्पामुळे निर्माण होणारी संपत्ती ठराविक लोकांकडेच जाते आणि स्थानिकांना त्याचा म्हणावा तसा लाभ होत नाही, यासाठी प्रकल्पामुळे त्या परिसरात होणाऱ्या सामाजिक बदलांचाही समाजशास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे. एवढेच नव्हे तर त्या परिसरातील सामाजिक स्वास्थ कायम राखण्यासाठी योजावयाच्या उपायांच्या खर्चाचा समावेश प्रकल्प खर्चात समाविष्ट केला गेला पाहिजे. नफा कमावित असताना प्रत्येक उद्योजकाने दारिद्यनिर्मुलनाच्या कार्यातही आपला सहभाग दिला पाहिजे. सामाजिक जाणीव आणि उत्तरदायित्व या भावनेतुनच आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
            तसेच वॉलस्ट्रीट आणि सातारा, पुणे येथील साखर उत्पादन क्षेत्राच्या आंदोलनाकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले की सध्या समाजात असमान विकासाबाबत असंतोष आहे. त्यामुळे विकास कार्य हाती घेताना सभोतालच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. जेव्हा जेव्हा व्यापार विषयक धोरणात बदल होतो. त्यावेळी जनतेवर त्यांचा परिणाम होतो. असे ही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.
            सामाजिक उद्योजकता पुरस्कार या संकल्पनेचे स्वागत करुन मुख्यमंत्री म्हणाले की, मोठे मोठे उद्योजक किंवा शासन जेथे पोहचू शकत नाही. तेथे योग्य ठिकाणी या उद्योजकांनी आपल्या कार्याची छाप पाडली आहे. त्यामुळे ते उद्योजक निश्चितच प्रशंसेस पात्र आहे.
यावर्षीचा सोशल आंत्रप्रुन्यर ऑफ दि इयर 2011 हा पुरस्कार बंगळुरच्या श्रीमती निलम छिब्बर यांना प्रदान करण्यात आहे. अंतिम फेरीतील चार उद्योजकांमधुन त्यांची निवड करण्यात आली.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा