शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

श्री. सुबल सरकार यांच्या निधनाबद्दलच्या शोकसंदेश




सुबलदांच्या नृत्यकलेतून राष्ट्रीय एकात्मतेचा
आगळावेगळा आविष्कार : पृथ्वीराज चव्हाण

संपूर्ण जीवन नृत्यसेवेसाठी व्यतीत करणारे प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनी मराठी, हिंदीसह वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील चित्रपटसृष्टीसाठी नृत्यदिग्दर्शन केले. याप्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचा कलात्मक आविष्कार घडविणारा कलावंत आपल्यातून निघुन गेला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
श्री. सरकार यांच्या निधनाबद्दलच्या शोकसंदेशात श्री. चव्हाण म्हणतात की, संपूर्ण आयुष्य अत्यंत निष्ठेने एखाद्या कलेच्या सेवेत समर्पण करणारे श्री. सरकार यांच्यासारखे कलावंत विरळा असतात. बांगला देशाच्या निर्मितीनंतर कलकत्त्यात स्थलांतर झाल्यापासून मुंबईत आल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील नृत्यदिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. कलाकार होण्याचे स्वप्न घेऊन सुबलदा लहानपणीच मुंबईत आले. अगदी सुरुवातीला तर त्यांनी फेरीवाला म्हणून काम केले. परंतु त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या स्वप्नाची पुर्तता करण्याचा चंग बांधला. सचिन शंकर यांची भेट हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण ठरला. सचिन शंकर यांच्या बॅलेमध्ये त्यांनी केलेले काम गाजले. स्वत:चे नृत्यपथक स्थापन करुन भारतभर भ्रमण केल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि नंतर मागे वळुन पाहिलेच नाही. राज्य सरकारचा उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचा सलग नऊ वेळा मिळविलेला पुरस्कार ही त्यांच्या मोठेपणाची साक्ष आहे. मराठी, हिंदीप्रमाणेच भोजपुरी, पंजाबी, बंगाली, राजस्थानी अशा अनेक भाषांमधील चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले. अनेक कलाकारांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराला आज आपण मुकलो आहोत.

                                                   00000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा