गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

भारत आर्थिक संमेलन


जागतिक आर्थिक परिषदेचे पहिले संमेलन मुंबईत
27 वर्षानंतर पहिला मान राज्याला
---------------------
जगभरातून 800 प्रतिनिधी सहभागी होणार
मुंबई दि.10 जागतिक आर्थिक परिषदेच्या सहकार्याने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2011 या कालावधीत मुंबई येथे वार्षिक इंडिया इकॉनॉमिक समिटचे (भारत आर्थिक संमेलन) आयोजन करण्यात आले असून आपल्या 27 वर्षाच्या इतिहासात प्रथमच ही समिट मुंबई येथे होत आहे. लिंकींग लिडरशिप विथ लाईव्हलीव्हूड अशी संकल्पना असलेल्या या संमेलनात 40 देशांमधून 800 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
 या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने गतिमान औद्योगिक विकास आणि सामाजिक-आर्थिक विकासाच्या उत्साहवर्धक अशा पर्वात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र हा उद्योगातील 26 पैकी 20 क्षेत्रांमध्ये संपूर्ण देशात अग्रेसर असून लवकरच 500 ते 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले 40 मोठे उद्योग राज्यात येत असून या उद्योगांसाठी पोषक वातावरण राज्यात आहे. जगभरात विशेषत: युरोपात आर्थिक अरिष्ट ओढवलेले असताना जागतिक आर्थिक परिषदेचे हे संमेलन भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात होत आहे हे उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूकीविषयी या संमेलनातील देश-विदेशातील प्रतिनिधींना माहिती मिळण्याची एक चांगली संधी आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जागतिक आर्थिक परिषदेचे आशिया विभागाचे वरिष्ठ संचालक सुशांत पालकुर्ती राव म्हणाले की, मुंबई येथे हे संमेलन आयोजित करणे प्रतिकात्मक आहे. आर्थिक विषयावरील महत्त्वाची चर्चा ही केंद्रीय स्तरावरुन राज्यपातळीवर व्हावी असा यामागचा उद्देश आहे. भारतातील राज्ये ही राष्ट्रीय आर्थिक अजेंड्याला आकार देण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या महाराष्ट्र राज्यात आणि देशाची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईत हे संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी या संदर्भात म्हणाले की, सध्याच्या अस्थिर अशा आर्थिक काळात या वर्षीचे हे संमेलन भारतातील विविध आकर्षक संधींना जगासमोर आणण्यात यशस्वी होईल. याशिवाय पुढील टप्प्यातील विकास निश्चित करण्यासाठी विविध उद्योग आणि लोकप्रतिनिधी  यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक मुख्यसचिव रत्नाकर गायकवाड यांनी केले. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, वरिष्ठ सचिव व उद्योग विभागाचे संबंधित अधिकारी, जागतिक आर्थिक परिषद तसेच सीआयआयचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
मान्यवरांचा सहभाग
12 ते 14 नोव्हेंबर या काळात हॉटेल ग्रॅन्ड हयात येथे होणाऱ्या या संमेलनात भारतातील उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असणार आहे. वाणिज्य, उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा, मानव विकास संसाधन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कपील सिब्बल, दूरसंचार आणि माहिती  तंत्रज्ञान राज्यमंत्री सचिन पायलट, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉण्टेकसिंग अहलुवालिया, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन गडकरी, नियोजन आयोगाचे सदस्य अरुण मायरा, केंद्रीय  नियोजन  राज्यमंत्री  अश्विनी कुमार, पंतप्रधानांचे सल्लागार सॅम पित्रोदा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांची उपस्थिती राहील, याशिवाय युनायटेड किंगडमचे पर्यावरण बदल राज्यमंत्री ग्रेगरी बार्कर, सिंगापूरचे पर्यावरण मंत्री व्हिवीयन बालकृष्णन, टांझानियाचे उद्योग मंत्री सिरील चामी, अमेरिकेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अनिश चोप्रा, एशिएन डेव्हलपमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक रजत नाग, आंतरराष्ट्रीय वित्तीय निधीचे  आशिया पॅसिफिक संचालक अनुप सिंग, न्यू साऊथ वेल्सचे प्रिमियर बॅरी ओ फॅरेल, ब्रिटीश कोलंबियाचे प्रिमियर खिस्ती क्लार्क  हे मान्यवर देखील उपस्थित राहतील.
टाटा कन्सलटन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन चंद्रशेखरन, गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज, अमेरिकेतील मॅनपॉवर समूहाचे अध्यक्ष जेफ्री जोरेस, जर्मनीतील ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनलचे हेगेट लाबेल, सुझलॉन एनर्जीचे अध्यक्ष तुलसी तांटी, आणि फ्रान्समधील अल्काटेल-ल्यूसेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन व्हरवायेन  हे उद्योग क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात विविध चर्चासत्रांचे अध्यक्षपद भूषवतील.

जागतिक आर्थिक परिषदेच्या या संमेलनाच्या कार्यक्रमांसाठी http://wef.ch/india2011 तसेच प्रमुख परिसंवादांच्या थेट प्रेक्षपणासाठी http://wef.ch/live या वेबसाईटसना भेट देऊ शकता.
त्याप्रमाणे सोशल नेटवर्कींग साईटस (‍िट्वटर, फेसबुक, ब्लॉग, यु टयुब) यावरुनही या संमेलनाचा मागोवा घेता येऊ शकेल.


000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा