आसामी संगीताचा दुवा निखळला
- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
मुंबई, दि. 5 : आसामी संगीताचा गोडवा आपल्या संगीत आणि गाण्यातून देशभर पोचविणारे ख्यातनाम संगीतकार आणि गायक पद्मभूषण भूपेन हजारिका यांच्या निधनाने भारतीय संगीतातील आसामी संगीताचा दुवा निखळला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आसाम येथे जन्मलेल्या हजारिका यांची संगीतकार आणि गायक अशी ओळख असली तरीही त्यांनी अनेक चित्रपटांमधून आपल्यातील उच्च प्रतीच्या दिग्दर्शकाची छाप उमटविली. 40 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत रमलेले हजारिका यांचा आसामी चित्रपट जागतिक चित्रपटलावर पोचविण्यात मोलाचा वाटा होता. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या हजारिका यांनी वयाच्या दहाव्या वर्षी गीत लेखनाला सुरवात केली.
इरा बातर सुर, शकुंतला, प्रतिध्वनी, लोटीघोटी, चिल्क मिल्क बिजुली, सिरज अशा नावाजलेल्या आसामी चित्रपटांचे दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. एक पल, रूदाली यासारख्या समांतर सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या आजही स्मरणात आहे. साहित्यसभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या हजारीका यांनी संगीतक्षेत्रात 50 हून अधिक काळ संगीताची सेवा केली. त्यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, आसामरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
0000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा