शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ



शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ
कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी
                                दहा कोटीं देणार -- मुख्यमंत्री
·       बाळासाहेब देसाई यांच्या नावे अध्यासन तीन कोटी
·       जैवतंत्रज्ञान विभागातील यंत्रसामग्रीसाठी सात कोटी

            कोल्हापूर दि.18 : शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी दहा कोटी, जैवतंत्रज्ञान विभागातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीसाठी सात कोटी आणि विद्यापीठाच्या उभारणीत मोलाचा वाटा असणाऱ्या बाळासाहेब देसाई यांचे नांवे अध्यासन सुरु करण्यासाठी तीन कोटी रुपये देण्याची घोषणा  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली.
            शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री  तथा अर्थमंत्री अजित पवार,सहकार संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, वन मंत्री डॉ. पतंगराव कदम, ग्राम विकास मंत्री जयंत पाटील,कामगार मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण, उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कुलगुरु डॉ. एन.जे.पवार आणि छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.
            मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले,'कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ माझ्यादृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. या विद्यापीठानं दक्षिण महाराष्ट्राच्या समाजकारणात मोलाची भर घातली आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कल्पनेतून विद्यापीठ साकारलं. माजी कुलगुर अप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाची उभारणी अतिशय बारकाईने लक्ष घालून केली.'
            मुख्यमंत्री म्हणाले, 'जागतिकीकरणामुळं जगातील अनेक देश एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका देशात गडबड झाली की त्याचा परिणाम दुसऱ्या देशावर होतो. अशा परिस्थितीत ज्ञानावर आधारित उद्योगच तारु शकतील. आपल्या देशाकडे नैसर्गिक साधनसंपत्ती फारच कमी आहे. देशाला महासत्ता म्हणून विकसित व्हायचं असेल तर ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचाच पाठपुरावा करावा लागेल. त्यामुळे आपल्या देशाची बौध्दिक शक्ती वाढवणे महत्वाचं आहे आणि हे विद्यापीठाचं कार्य आहे. शिवाजी विद्यापीठानं असे कार्य करण्यात आघाडी घ्यायला हवी.'
            शिवाजी विद्यापीठाचा सध्या नॅकचा दर्जा '' आहे. तो  उंचवायला हवा, त्यादृष्टीने कुलगुरु, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी प्रयत्न करावेत. विद्यापीठाला राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही.  विद्यापीठानेही केंद्रातून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करावा, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'सध्या विद्यापीठांना खासगी विद्यापीठांचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत गुणवत्ता आणि बुध्दिमत्ता यालाच महत्व आहे. माहिती तंत्रज्ञानापाठोपाठ आता जैवतंत्रज्ञानाला महत्व आलं आहे. विद्यापीठानं या क्षेत्रावर आता अधिक लक्ष केंद्रीत करावं, शिवाजी विद्यापीठानं आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त करावा.'
         यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री  डॉ. पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांचीही भाषणे झाली.
            तत्पुर्वी, मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते माजी कुलगुरु सर्वश्री  रा.कृ.कणबरकर,के.बी. पवार, प्रा. द.ना. धनागरे, डॉ. माणिकराव साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुलसचिव के. आर. यादव, एन.बी. पाटील आणि व्ही. एम. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

           
                                                                                  00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा