39 वाढीव नगराध्यक्ष पदांसाठी महिला आरक्षण जाहीर,
226 पैकी 114 नगराध्यक्षपदे महिलांसाठी राखीव
मुंबई, दि.4 : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील एकूण 226 नगरपालिकांपैकी 114 नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी आता महिला विराजमान होणार आहेत. यापूर्वी महिलांसाठी 30 टक्के पदे आरक्षित होती. आज उर्वरित पदांसाठी सोडत काढण्यात आली व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील वाढीव आरक्षण जाहीर करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.
राज्यात एकूण 226 नगरपालिका आहेत. यापुर्वीच्या 30 टक्के महिला आरक्षणाच्या धोरणानुसार 9-3-2010 रोजी सोडत काढून त्यापैकी 75 नगरपालिकांची नगराध्यक्षपदे महिलांसाठी प्रवर्गनिहाय राखीव ठेवण्यात आली होती. यानंतर 50 टक्के पदे आरक्षित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 11 आणि खुल्या प्रवर्गासाठी 22 अशी एकूण 39 वाढीव पदे महिलांसाठी राखीव ठेवणे आवश्यक झाले. या 39 वाढीव पदांसाठी आज सोडत काढण्यात आली. यापुर्वीची 75 पदे अधिक वाढीव 39 पदे मिळून 114 नगराध्यक्षपदे आता महिलांसाठी राखीव झाली आहेत. 6 मे 2010 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आलेले नगराध्यक्ष पदांचे आरक्षण खालील 39 नगरपालिका वगळता सध्या आहे तेच राहील.
आज महिलांसाठी राखीव झालेल्या प्रवर्गनिहाय नगरपालिका पुढीलप्रमाणे :-
1. अनुसूचित जाती प्रवर्गातील वाढीव महिला आरक्षण (4 पदे) - आर्वी (जि.वर्धा), मोहपा(जि.नागपूर), देगलूर(जि.नांदेड), मुरगुड(जि.कोल्हापूर)
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील वाढीव महिला आरक्षण (2 पदे) - काटोल (जि.नागपूर) आणि भंडारा(जि.भंडारा)
3. नागरिकांचा मागास प्रवर्गातील वाढीव महिला आरक्षण (11 पदे) - रहिमतपूर (जि. सातारा), फैजपूर (जि.जळगाव), चांदूरबाजार (जि.अमरावती), तळोदा (जि.नंदूरबार), पारोळा (जि.जळगाव), पातूर(जि.अकोला), वाई (जि.सातारा), निलंगा (जि.लातूर), सिंदी (जि.वर्धा), आष्टा (जि.सांगली), आणि सासवड (जि.पुणे)
4. खुल्या प्रवर्गातील वाढीव महिला आरक्षण (22 पदे) - महाड (जि.रायगड), उमरेड (जि.नागपूर.), किल्लेधारूड(जि.बीड), परतूर(जि.जालना), मोवाड(जि.नागपूर), बारामती (जि.पुणे), तासगाव(जि.सांगली), वाशिम (जि.वाशिम), पेण (जि.रायगड), बीड (जि.बीड), बल्लारपूर (जि.चंद्रपूर), अंबरनाथ (जि.ठाणे), भगूर(जि.नाशिक), शिर्डी (जि.अहमदनगर), गडहिंग्लज (जि.कोल्हापूर), कंधार(जि.नांदेड), बसमतनगर (जि.हिंगोली), नांदगाव (जि.नाशिक), दिग्रस (जि.यवतमाळ), राजुरा (जि.चंद्रपूर), इस्लामपूर (जि.सांगली) आणि देवळाली प्रवरा(जि. अहमदनगर)
---0---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा