गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

एसीई-टेक प्रदर्शनाचे उद्‌घाटन


मुंबईत गुंतवणुकीचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
       मुंबई, दि. 3 : मुंबईत कोस्टल लिंक रोड, ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‍िवमानतळ आदी महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आजच्या  प्रदर्शनात उपस्थित असलेल्या देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक करावी आणि आपला सहभाग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. इकॉनॉमिक टाईम्स आयोजित 13 व्या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन इंजिनिअरींग प्रदर्शनाचे (एसीई-टेक) उद्‌घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
          श्री.चव्हाण यावेळी म्हणाले की, बांधकाम व्यवसायात नवनवीन संकल्पनांचा सहभाग होत आहे. शहरामधील बांधकाम पर्यावरण संतुलीत व्हावे.
          राष्ट्राच्या उभारणीसाठी बांधकाम उद्योगाचे महत्त्वाचे योगदान असून मुंबई तसेच राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झीबीशन सेंटर व्हावेत, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
          गोरेगाव येथील मुंबई एक्झीबीशन सेंटर मध्ये तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये आर्किटेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरींग या क्षेत्रातील विविध देशातीत नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत
टाईम्स ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट राजेश गांधी, एबीईसीचे व्यवस्थापकीय संचालक एम.एम.गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना तसेच छगन भुजबळ यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूएसए आणि आयएएमडीए च्या अध्यक्षा कॅथरने ॲब्रनाथी, क्लॅटन एंड असोसिएटस् यूएसए च्या नॅन्सी क्लॅटन, पिटर व्हॅले, युकेचे लॉरी निस्बेट, आर्किटकक्ट हाफिझ कॉन्‍ट्रॅक्टर आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
          यावेळी टाईम्स ग्रुपचे राजेश गांधी, एम.एम. गांधी यांचे समयोचित भाषणे झाली.  कार्यक्रमास देश-विदेशातील उद्योग, बांधकाम, इंजिनिअरिंग व्यवसाय आदी उद्योग समुहातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 0 0 0 0
         


परभणी महापालिका अस्तित्वात आल्याने
नगरपरिषदेची निवडणूक होणार नाही
          मुंबई, दि. 3 : शासनाने परभणी नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर केल्यामुळे तेथे आता पूर्वनियोजनानुसार 8 डिसेंबर 2011 रोजी होणारी नगरपरिषदेची निवडणूक होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
          राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी राज्यातील 196 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच घोषित केला आहे. त्यात परभणी नगरपरिषदेचाही समावेश होता. परंतु तेथे महानगरपालिका स्थापन करावयाची असल्याने शासनाने 1 नोव्हेंबर 2011 पासून परभणी नगरपरिषद संपुष्टात आल्याचे अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे परभणी नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. नव्या परभणी महानगरपालिकेची निवडणूक यथावकाश घेण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. 
000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा