गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक


सणाचा आनंद घेत असताना सर्वांनी कायद्याचे
पालन करुन कायदा सुव्यवस्था राखावी : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 : सर्वधर्मसमभावाची आणि शांततामय सहजीवनाची परंपरा जपत सर्वधर्मियांनी एकमेकांच्या सणांचा आनंद घ्यावा. मात्र कायद्याचेही उल्लंघन होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी. मुस्लिम धर्मीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या बकरी ईदसाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज  चव्हाण यांनी आज दिली. सर्वांकडून कायद्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन हा सण याकाळातील इतर धर्मीयांचे सण सर्व नागरिकांनी बंधुभाव आणि शांततेत साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बकरी ईदनिमित्त कायदा सुव्यवस्थेसंदर्भात मंत्रालयात आज उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, पशुसंवर्धन मंत्री मधुकरराव चव्हाण, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार सर्वश्री नवाब मलिक, बाबा सिद्दीकी, अमीन पटेल, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त सुबोधकुमार, महसुल विभागाचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रीय, परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. एस. के. शर्मा, गृह (अपील सुरक्षा) विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मेधा गाडगीळ, परिवहन आयुक्त श्री. वि. ना. मोरे, ठाणे महापालिका आयुक्त एल. आर. गुप्ता, मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक, ठाण्याचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी, नाशिकचे पोलीस आयुक्त विनोद लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी अल्पसंख्याक आयोगाने विशेष हेल्पलाईन सुरु केली आहे. त्याच धर्तीवर परिवहन विभागानेही हेल्पलाईन सुरु करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. राज्य पोलिस मुख्यालयातील 2202 6680 या दूरध्वनी क्रमांकावरही नागरिकांना केव्हाही संपर्क साधता येईल. हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणार आहे.
जनावरांच्या व्यापाऱ्यांनी मागील काही वर्षात कायद्याचे योग्य पालन केल्याने जनावरे वाहतुकीतील गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे, असे सांगुन गृहमंत्री श्री. पाटील म्हणाले की, याबाबतीत येणाऱ्या तक्रारीसंदर्भात गृहविभागामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक आयोगामार्फत सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईनवर नागरिकांकडून विविध तक्रारी नोंदविल्या जात आहेत. या तक्रारी पोलीस किंवा परिवहन विभागाकडे मांडल्यास त्याचे तातडीने निराकरण व्हावे, अशी अपेक्षा श्री. नसीम खान यांनी व्यक्त केली.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा