महाराष्ट्र कुपोषणमुक्त करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री
मुंबई दि. 2 : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज 2 आक्टोंबर पासून राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान पूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. गावपातळीपर्यंत व लाभार्थी पातळीवर दि. 14 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. राजामाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र कुपोषण मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सशक्त व बलवान पिढी महाराष्ट्राचे उज्वल भवितव्य घडवू शकते. कुपोषणासारखी समस्या मुळापासून नष्ट व्हावी हा महाराष्ट्राचा निर्धार आहे. त्यादृष्टीने शासनाची पावले पडत आहेत. स्वयंपुर्ण व सक्षम गावाची निर्मिती व्हावी यासाठी शासन कटीबध्द आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तरुण खासदारांनी ग्रामीण भागात विविध ठिकाणी कुपोषणाची परिस्थिती व समस्या जवळून पाहिली आहे. त्यावर कशाप्रकारे मात करण्यात येईल याचा ते अभ्यास करत आहेत. ग्रामीण भागातील याबाबत ज्या समस्या असतील त्या सोडविण्यासाठी केंद्रासोबत महाराष्ट्रसुध्दा पुढाकार घेत असून महाराष्ट्राची सध्याची स्थिती पाहाता 27 टक्के कुपोषण घटले आहे. जे शिल्लक आहे ते कोणत्या प्रकारचे कुपोषण आहे याबाबतची पाहणी युनिसेफच्या माध्यमातून शासन करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बालके सुदृढ राहतील यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करुन, महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, ग्रामविकास विभाग इत्यादी विविध विभागाच्या आणि युनिसेफ मुंबईच्या सहकार्याने लोकसहभागाच्या माध्यमातून अभियान राबविले जाणार आहे.
याप्रसंगी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,कुपोषणाचा परिणाम बालकाच्या संपुर्ण शरिरावर होतोच तसेच त्याच्या बौध्दीक पातळीवर सुध्दा विपरीत परिणाम होतो. त्यासाठी मातेला चांगला सकस आहार देणे आवश्यक आहे. कुपोषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.या अभियानासाठी सर्वोतोपरी मदत शासन करेल.
यावेळी महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, अभियानाचे उददीष्ट कुपोषणमुक्त महाराष्ट्र आहे. कुपोषणाची समस्या राज्यापुढील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार .
यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, महिला व बालविकास प्रधान सचिव वंदना कृष्णा, राजामात जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषण मिशनचे महासंचालक श्री. नंदकुमार तसेच अधिकारी वर्ग व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा