सोमवार, ३ ऑक्टोबर, २०११

लोकशाही दिन कार्यक्रम


 स्वयंरोजगारासाठी जागा देतांना अपंग महिलांना प्राधान्य 
                                                                         - मुख्यमंत्री
     
   मुंबई दि. 3:  अपंग व्यक्तींना यापुढे स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देतांना 100 टक्के अपंगत्व असलेल्यांना प्रथम प्राधान्य याप्रमाणे अपंगत्वाची टक्केवारी निश्चित करण्यात यावी त्यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात यावे,  अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
            आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक  के. सुब्रम्हण्यम्, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            श्रीमती सुनीता नंदु चौरे या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या अपंग महिलेने ठाणे महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. तथापि आपणाला डावलून इतरांना जागा वाटप केल्याची तक्रार या महिलेने केली होती. यासंदर्भात सर्व माहिती घेतल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने 2007 साली 6 अपंग व्यक्तींना चूकीच्या पद्धतीने रोजगारासाठी जागा वाटप केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले.  याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मात्र ज्या अपंग व्यक्तींना जागा देण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून त्या परत घेणे उचित ठरणार नाही , असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे महानगरपालिकेने पदपथ आणि रस्त्यावरील जागांचे वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने अन्यत्र उपलब्ध असलेल्या जागा अपंगांना देण्याचा निर्णय होईल त्यावेळी अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार प्राधान्याने महिलांना जागा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेशही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.
            मंत्रालय लोकशाही दिन कार्यक्रमा प्राप्त अर्जावर दिलेल्या कार्यवाहीच्या सूचनांचे पालन ही विशिष्ट कालावधीत  करण्यात येऊन ही प्रकरणे निकाली काढण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेस देण्यात याव्यात असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संागितले.
            आतापर्यंत झालेल्या 62 मंत्रालय लोकशाही दिन कार्यक्रमामध्ये 1741 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 1740 अर्ज निकाली काढण्यात आले असून एका अर्जावरील कार्यवाही प्रलंबित आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी यावेळी दिली.
            आज झालेल्या मंत्रालय लोकशाही दिन कार्यक्रमात प्राप्त 9 अर्जापैकी 6 अर्जदार उपस्थित होते हे अर्ज प्रामुख्याने  नगरविकास विभाग, गृह विभाग, सहकार,पणन वस्त्रोद्योग विभाग, उद्योग-ऊर्जा कामगार विभाग, महसूल वन विभागाशी संबंधित होते.
. . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा