रविवार, २ ऑक्टोबर, २०११

स्वच्छता उत्सवाचा शुभारंभ


निर्मल महाराष्ट्र करण्याचे स्वप्न साकार करुया - मुख्यमंत्री
    मुंबई दि.2: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राज्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या योजनेंतर्गत  निर्मल ग्राम पुरस्कार मिळविण्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायती आघाडीवर राहिल्या आहेत. आता ग्रामीण भागाबरोबरच नागरी भागातील जनतेचा सहभाग घेऊन स्वच्छ, सुंदर असा निर्मल महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न साकार करु या असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
     पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने आयोजित केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामीण व नागरी स्वच्छता अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत स्वच्छता उत्सवाचा शुभारंभ सहयाद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते  बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री रणजित कांबळे, आमदार सर्वश्री मंगलप्रभात लोढा व विनायक मेटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ए. के. जैन, पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागाचे प्रधान सचिव सुधीर ठाकरे, युनिसेफचे डेव्हीड मॅक्लोलिन आदी  उपस्थित होते.
     गत सहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य निर्मल ग्राम पुरस्कार मिळविण्यात अग्रेसर आहे. हा लौकिक टिकविणे महत्वाचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी  प्रशासनासह माहिती, शिक्षण, संवाद याचा वापर करुन जनजागृती करणे आवश्यक आहे. स्वच्छता अभियानामध्ये शासकीय सहभागाबरोबर लोकचळवळीचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच संपूर्ण स्वच्छता अभियान हे केवळ शौचालय बांधणे यापुरते मर्यादीत नसून शाळा, महाविद्यालयांचे परिसर स्वच्छ ठेवणे, आंगणवाडया,घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, लोकांचे मतपरिवर्तन याबाबींचाही त्यात अंतर्भात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आजपासून संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता उत्सवामुळे ग्रामीण व नागरी भागातील स्वच्छतेविषयक लोकचळवळीस अधिक बळकटी  मिळेल व नागरिकांच्या स्वास्थांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केला.तसेच 15 ऑक्टोंबर पासून सुरु होणाऱ्या हात धुवा मोहिमेमुळे स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचण्यास मदत होईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
     राज्यातील जनतेने श्रमदानाने संत गाडगेबाबा अभियान यशस्वीपणे राबविले आहे. तथापि अजूनही कांही जिल्हे स्वच्छतेच्या बाबतीत मागास असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रशासनाने राज्याचा कानाकोपऱ्यात स्वच्छता अभियान राबवावे. संत गाडगेबाबा  ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामीण भागात स्वच्छतेचे काम उत्तमरित्या चालले आहे. मात्र सध्या नागरीकरण मोठया प्रमाणावर होत असल्याने नागरी  भागातही स्वच्छता अभियान जोमाने राबविण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागात एकही मूल उघडयावर शौचालयास बसणार नाही असे काम या अभियानांतर्गत करण्याचा संकल्प करु या असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
   दि. 2 ऑक्टोंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता उत्सवादरम्यान स्वच्छतेविषयक व्यापक जनजागृती करण्यात येणार असून नागरिकांच्या स्वच्छतेविषयक सवयीमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी यावेळी सांगितले. स्वच्छता उत्सवादरम्यान स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे श्री. ढोबळे यावेळी म्हणाले.
     ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यावेळी म्हणाले की, स्वच्छता ही जीवनाशी निगडीत असून स्वच्छतेचे महत्व शिक्षण व्यवस्थेतूनच पटवून देणे जास्त परिणामकारक ठरेल.
     प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते राज्यस्तरीय स्वच्छता उत्सवाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.       15 ऑक्टोंबर  पासून सुरु होणाऱ्या हात धुवा मोहिमेचा संदेश घराघरात पोहचविणारे भित्तीपत्रक तसेच निर्मल संवाद या त्रैमासिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.   प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते निर्मल ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव सुधीर ठाकरे यांनी केले. तर उपसचिव शैला ए. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
     या कार्यक्रमास पंचायत समित्यांचे सभापती व विविध गावचे सरपंच मोठया प्रमाणात उपस्थित होते.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा