राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी केंद्राकडे
वाढीव निधीची मुख्यमंत्र्यांची आग्रही मागणी
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्रातील वाहनांची वाढती रहदारी, मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस यामुळे रस्त्यांची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करावी लागते. राज्यातील मुंबई-गोवा या 17 क्रमांकाच्या महामार्गासह अनेक राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती यासाठी केंद्र सरकारने जादा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री सी.पी.जोशी यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, वन, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सदस्य डॉ. जे. एन्. सिंग, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा महाराष्ट्र-गोवा राज्यांना जोडणारा आणि कोकणातील महत्वाचा महामार्ग आहे. वाहनांची वाढती वर्दळ, पावसाचे प्रचंड प्रमाण यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण तसेच दुरुस्ती आवश्यक आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 2600 कि.मी आहे. मात्र त्यांच्या डागडुजीसाठी मिळणारा निधी पुरेसा नाही. त्यामुळे या निधीमध्ये वाढ व्हावी, अशी मागणी श्री.चव्हाण यांनी केली.
महाराष्ट्र वेगाने विकसित होत असलेले प्रमुख राज्य असल्याने राज्य सरकारच्या सर्व प्रस्तावांवर विचार करुन निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री सी.पी.जोशी यांनी सांगितले.
राज्यातील प्रमुख राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल-इंदापूर भागाचे पहिल्या टप्प्यात चौपदरीकरण, कशेडी घाटाची दुरुस्ती, झाराप-पत्रादेवी बायपास यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने सादरीकरण केले.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा