बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

34व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार


राज्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी शासन प्रयत्नशील- मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 21 : राज्यात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            34व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजेत्या खेळाडूंचा सत्कार येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, विधानसभा सदस्य श्रीमती ॲनी शेखर, क्रीडा व युवक सेवा, पुणे आयुक्त शिरीश कारले, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव बाळासाहेब लांडगे, शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमीत मलीक आदी उपस्थित होते.
            पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन या वर्षीच्य स्पर्धेत विशेष कामगिरी केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बक्षिसांच्या रकमेमध्ये 10 पट वाढ करण्यात आली आहे. खेळाडूंना 5 टक्के कोट्यातून शासकीय नोकरी तसेच विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर क्रीडा संकुले बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून विभागीय पातळीवरील 6, जिल्हा पातळीवरील 12 तसेच तालुका पातळीवरील 71 क्रीडा संकुले प्रगतीपथावर आहेत तसेच राज्यभरातून 11 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरु असून त्यामध्ये 598 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचे क्रीडा व युवा धोरण लवकरच जाहीर होणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
            आपल्या अध्यक्षीय भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला रुस्तम-ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार व बॉम्ब स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्‌धांजली अर्पण करुन क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देऊन पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. तसेच कब्बडी, खो-खो, कुस्ती या सारख्या खेळांचा देखील विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
            क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सोनेरी क्षण असा उल्लेख करुन राज्यात क्रीडा संस्कृती वाढावी व पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
            यावेळी क्रीडा स्पर्धेतील सांघीक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रावीण्यधारक 213 खेळाडू व 31 क्रीडा मार्गदर्शक यांना शासनाच्यावतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यास 5 लाख रुपये, रौप्य 3 लाख रुपये, कांस्य 1.50 लाख रुपये तसेच क्रीडा मार्गदर्शकांना सुवर्ण 50 हजार रुपये, रौप्य 30 हजार रुपये व कांस्य 20 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. एकूण 9.30 कोटी रुपये यावेळी बक्षिस स्वरुपात देण्यात आले.
महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू
जलतरणपटू विरधवल खाडे 49 लाख रुपये, श्रीमती आरती घोरपडे 29.50 लाख रुपये, जिम्नॅस्टीक्स श्रीमती अक्षदा शेटे 21.50 लाख रुपये, श्रीमती शिप्रा जोशी 21 लाख रुपये, नेमबाज तेजस्विनी सावंत 20 लाख रुपये, जलतरण पूर्वा शेटे 18 लाख रुपये, श्रीमती ऋतुजा भट 17.50 लाख रुपये, डायव्हिंग श्रीमती ऋतिका श्रीराम 15 लाख रुपये, टेबल टेनीस श्रीमती मधुरिका पाटकर 15 लाख रुपये, जलतरण मंदार दिवसे 13.50 लाख रुपये, श्रीमती आदिती धुमाटकर 13 लाख रुपये, शूटींग श्रीमती राही सरनोबत 12 लाख रुपये व श्रीमती अंजली भागवत 11.50 लाख रुपये, टेनिस करण रस्तोगी 11.50 लाख रुपये, ॲथलेटिक्स श्रीमती कविता राऊत 10 लाख रुपये, शूटींग श्रीमती प्रिया अग्रवाल 10 लाख रुपये, जलतरण श्रीमती अवंतिका चव्हाण 10 लाख रुपये, टेबल टेनिस श्रीमती पूजा सहस्त्रबुद्धे 10 लाख रुपये यांच्यासह इतर सर्व पदक विजेते खेळाडूंना याप्रसंगी गौरविण्यात आले आहे.
0 00 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा